मुंबई : गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याचे ३ कोटींचे हिरे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हिरे खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने पाठवलेल्या व्यक्तीनेच हे हिरे लंपास केले आहेत. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

फिर्यादी शील कोरडिया (२१) हा गुजराथमधील सुरत येथे राहतो. त्याची वडिलोपार्जित लेल्सिंग डायमंड नावाची कंपनी आहे. या कंपनीमार्फत त्याचा व्यवहार सुरू आहे. कंपनीच्या कामानिमित्ताने तो वेगवेगळ्या शहराला भेटी देत असतो.

३ कोटींच्या हिऱ्यांची ऑर्डर

चैतन्य मेहता हे फिर्यादीचे नियमित ग्राहक आहेत. त्यांच्यामार्फत अनेक वेळा हिरे खरेदी करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात चैतन्य मेहता यांनी शील कोरिया याला ६६६.६५ कॅरेट चे ३ कोटी रुपये किंमतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांची ऑर्डर केली होती. हे हिरे घेण्यासाठी मेहता यांनी त्यांच्या परिचयाच्या जिमित आणि रकिन या दोघांना गुजराथमधील नवसारी येथे पाठवले होते. या दोघांनी ६ सप्टेंबर रोजी शील कोरडिया याच्या कंपनीत जाऊन हिरे ताब्यात घेतले. दरम्यान, ग्राहक मेहता यांनी हे हिरे विक्रम संघवी याला मुंबईला घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार जिमित आणि रकीन या दोघांनी विक्रम संघवी याला हिरे दिले.

हिरे मुंबईत पोहोचलेच नाहीत

हे हिरे घेऊन संघवी मुंबईत येण्यासाठी निघाला होता. मात्र हे हिरे मुंबईत पोहोचलेच नाहीत. उलटपक्षी हिरे मिळाले नसल्याचा दावा विक्रम संघवीने केला. यामुळे हिऱ्यांचा तपास सुरू झाला. विक्रम संघवी यानेच मधल्या मध्ये हिऱ्यांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले.

बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या फसवणुकी प्रकरणी शील करोडिया याने बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार बोरिवली पोलिसांनी विक्रम संघवी याच्याविरोधात हिऱ्याचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२) आणि ३१६ (३) अन्वये गु्न्हा दाखल केला आहे.