मुंबई: मुंबईत तब्बल सहा वर्षांनी दुर्मिळ आणि निशाचर ‘सायक्स नाईटजार’चे दर्शन घडले असून क्षीण अवस्थेत सापडेल्या ‘सायक्स नाईटजार’वर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. मुंबईतील वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी ही नोंद महत्त्वाची मानली जात आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ‘सायक्स नाईटजार’ क्षीण अवस्थेत आढळला होता. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर (रॉ) संस्थेशी संपर्क साधला आणि या पक्ष्याविषयी माहिती दिली. संस्थेचे सदस्य राहुल भोसले आणि प्रथमेश पांचाळ यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन ‘सायक्स नाईटजार’ला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पशुवैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याच्या पोटात संसर्ग झाला होता. त्यामुळे भूक मंदावून तो अशक्त झाला होता. त्याच्यावर ‘रॉ’ संस्थेच्या केंद्रात ११ दिवस उपचार करण्यात आले. पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हवामान बदल किंवा मुसळधार पावसामुळे हा ‘सायक्स नाईटजार’ भरकटून येथे आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ‘सायक्स नाईटजार’ हा अत्यंत लाजाळू आणि निशाचर पक्षी आहे. तो शहरात आढळणे ही दुर्मिळ बाब आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात या पक्ष्याची सुटका, उपचार आणि पुनर्वसन करणे ही महत्त्वाची नोंद मानली जात आहे, असे ‘रॉ’चे अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले.
‘सायक्स नाईटजार’ पक्ष्याविषयी
हा पक्षी मुख्यत्वे मध्य भारत, राजस्थान, गुजरात या भागात आढळतो. त्याची रात्रकालीन जीवनशैली आणि रंग यामुळे तो सहज नजरेस पडत नाही. ‘सायक्स नाईटजार’ हा आकाराने लहान पक्षी असून त्याची लांबी सुमारे २०-२५ सेंटीमीटर आणि वजन सुमारे ६० ग्रॅम असते. त्यांचा पिसारा प्रामुख्याने तपकिरी आणि राखाडी रंगाचा असतो, वरच्या भागावर वाळूचा रंग आढळतो आणि त्यांच्या शरीरावर काळे तपकिरी आणि फिकट तपकिरी ठिपके असतात, त्यामुळे त्याचा पिसारा झाडाची साल, वाळलेल्या पानांचा कचरा किंवा वाळूसारखा दिसतो.
पक्षी अभ्यासकांना यापूर्वी मुंबईतील भांडूप उदंचन केंद्र परिसरात २०१९ मध्ये ‘सायक्स नाईटजार’ दिसला होता. याचबरोबर उपलब्ध माहितीनुसार, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) संग्रहात ‘सायक्सच्या नाईटजार’ प्रजातीचा एक नमुना आहे, तो ऑक्टोबर १९१५ मध्ये कल्याण येथे सापडला होता.