मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी शिवसेनेच्या (ठाकरे) माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची निवड करण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर रिक्त असलेल्या संचालकपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त करीत तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटातील पदाचा राजीनामा दिला होता. त्यात आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी तेजस्वी घोसाळकर यांची निवड झाल्याने ठाकरे गटाविषयीची नाराजी दूर झाली किंवा भाजपकडून या पदावर त्यांची वर्णी लावली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील निवडणुकीसाठी दोन वर्षेच असल्याने अशावेळी निवडणूक न घेता संचालक निवडण्याचा अधिकार संचालक मंडळाकडे असतो. त्यानुसार अभिषेक घोसाळकर यांच्या रिक्त असलेल्या पदावर तेजस्वी घोसाळकर यांची निवड करण्यात आली. मुंबै जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी याविषयीची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपच्या वाटेवर ?

एकीकडे शिंदे गट तसेच भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेच्या संचालकपदावर तेजस्वी घोसाळकर यांची निवड झाल्याने येत्या काळात त्या शिवसेनेची (ठाकरे) साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.