मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटनावर गंभीर परिणाम होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. दल लेकवर चालणाऱ्या हाऊसबोटींची बुकिंग रद्द होण्यास हल्ल्यानंतर काही तासांतच सुरुवात झाली. आधीच मंदावलेल्या पर्यटन उद्योगाला पुन्हा उभारी मिळेल अशी आशा असताना घडलेल्या या घटनेने स्थानिक व्यावसायिकांची चिंता वाढवली आहे.

ऐन गर्दीच्या मोसमात…

हल्ल्यानंतर काही तासांतच पर्यटकांनी बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली. एप्रिल- मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये येणारी गर्दी ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, पण आता सर्व काही अनिश्चित झालं आहे, असे सांगत स्थानिक हाऊसबोट मालक साहिब यांनी त्यांच्या व्यथेला वाट मोकळी करून दिली. एरवी एप्रिल-मे महिन्यांत गर्दी असलेल्या हाऊसबोट आज रिकाम्या पडल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. यामुळे या हंगामातील आमचे सर्व उत्पन्नच थांबणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

हंगामात साधारण दोन माणसांसाठी ६ हजार ते ७ हजार रुपये आकारले जातात. यामध्ये सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण याचा समावेश असतो. अनेकदा संपूर्ण कुटुंबाचे बुकिंग करण्यात आलेले असते. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येकी १५ ते १६ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे हाऊसबोट व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने मुंबई तसेच विदेशी पर्यटकांचा समावेश आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका

हॉटेल व्यावसायिक, स्थानिक टूर गाईड्स आणि छोट्या हस्तकला विक्रेत्यांनाही या घटनेचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. पर्यटन हाच प्रमुख उदरनिर्वाहाचा स्रोत असल्याने स्थानिक लोकांमध्ये सध्या अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण आहे.

गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये पर्यटनामुळे थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा एकदा अस्थिरतेचे सावट या व्यवसायावर पडले आहे. स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरी पर्यटकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी वेळ लागणार आहे.

हाऊसबोट व्यावसायिकांवर परिणाम

– हल्ल्यानंतर पर्यटक मोठ्या प्रमाणावर हाऊसबोट बुकिंग्स रद्द करतात, ज्यामुळे उत्पन्नात मोठी घट होते.

– एप्रिल ते ऑगस्ट हा हाऊसबोट व्यवसायाचा हंगाम असतो. याचवेळी हल्ला झाल्यामुळे संपूर्ण हंगाम वाया जाण्याची शक्यता

– अनेक व्यावसायिकांनी हाऊसबोट्ससाठी कर्ज घेतलेले असते. उत्पन्न थांबल्यामुळे हप्ते भरता येत नाहीत.

– बुकिंग नसली तरी मेंटेनन्स, कर्मचाऱ्यांचे पगार, साफसफाई, सुरक्षा यांचा खर्च चालूच राहतो.

– स्वयंपाकी, सफाई कर्मचारी, गार्ड यांची कामे जातात. अनेक जणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अनेक हाऊसबोट व्यावसायिकांकडे विमा नसतो किंवा तो अपुरा असतो. हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळत नाही.