मुंबई: सामाजिक कार्यकर्त्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करीत आठ ते दहा तृतीयपंथीनी विक्रोळी येथे रविवारी रात्री सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या सर्व तृतीयपंथीवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी पार्कसाईट पोलीस तपास करीत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन पोलीस त्यांच्यावर कडक कारवाई करीत आहेत. गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात मार्च महिन्यात पोलिसांनी आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. तपासात हे नागरिक शहरात तृतीयपंथी बनून वास्तव्य करत असल्याचे समोर आले.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबू खानला (४४) अटक केली होती. या तृतीयपंथीचा संबंध बांगलादेशी ज्योती माँ या संस्थेशी असल्याचा आरोप करण्यात आला होता.

विक्रोळी परिसरात राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने सर्व तृतीयपंथीची बदनामी केली असून त्याच्याकडून सध्या मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचा आरोप तृतीयपंथीनी केला आहे. याच त्रासाला कंटाळून आठ ते दहा तृतीयपंथीनी रविवारी रात्री विक्रोळीच्या अमृतनगर परिसरात फिनेल पिऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पार्कसाईट पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.