अवाजवी खर्चामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून आराखडय़ात बदल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली या ३२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गावरील तब्बल १८ स्थानके भूमिगत करत प्रवाशांना भुयारी रेल्वेची सैर घडविण्याचे बेत आखणाऱ्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने खर्चाच्या अवाजवी उड्डाणांमुळे हा मोह आवरता घेतल्याचे वृत्त असून या संपूर्ण मार्गाची आखणी उन्नत (एलेव्हेटेड) स्वरूपाची करण्याचा निर्णय जवळपास पक्का करण्यात आला आहे. सुमारे १९ हजार कोटी रुपयांचा खर्च, ३० पैकी १८  भूमिगत स्थानकांची पायाभरणी, विक्रोळीतील गांधी नगर ते मुलुंड चेकनाक्यापर्यंत अत्यंत वर्दळीच्या अशा लाल बहादूर शास्त्री मार्गावर करावे लागणारे वाहतुकीचे किचकट नियोजन आणि एवढा द्राविडी प्राणायाम करूनही भविष्यात वाढीव खर्चाच्या शक्यता, यामुळे हा मेट्रो प्रकल्प भुयारी करण्याऐवजी उन्नत करण्याचा प्रस्ताव दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने मुंबई महानगर विकास प्राधिकरणापुढे ठेवला आहे.

महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या प्राथमिक आराखडय़ानुसार, घाटकोपर ते मुलुंडदरम्यान मेट्रोचा मार्ग भुयारी ठेवण्यात आला होता. पुढे मुलुंड चेकनाक्यापासून ठाण्यातील घोडबंदर येथील कासारवडवलीपर्यंत हा मार्ग उन्नत ठेवण्याचे नियोजन होते. मात्र, भुयारी मेट्रोसाठी प्रति किलोमीटरमागे सुमारे ५५० कोटी रुपये खर्च होणार होते. तुलनेने उन्नत मार्गासाठी २५० कोटी रुपये म्हणजे निम्माच खर्च झाला असता. त्यामुळे विक्रोळीतील गांधी नगर ते मुलुंड अशा अंतर्गत मार्गाऐवजी तो पूर्व द्रुतगती महामार्गावरून राबविता येऊ शकेल का, याची चाचपणी करण्यासाठी या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात असल्याची माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या बृहत् आराखडय़ातील तब्बल ११८ किलोमीटर अंतराच्या आणि सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्चाच्या चार मेट्रो मार्गाना सहा महिन्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. त्यानुसार वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मार्गावर मेट्रो प्रकल्पास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या मार्गाचा मूळ आराखडा यापूर्वी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने तयार केला आहे. त्यानुसार ३२ किलोमीटर अंतरापैकी तब्बल २७ किलोमीटर अंतराचा मार्ग भुयारी ठेवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

तसेच, या प्रकल्पात एकूण ३० स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी १८ स्थानके भूमिगत आणि ठाण्याच्या हद्दीतील १२ स्थानके उन्नत करण्याचे ठरविले होते. या प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे १९ हजार कोटी रुपये इतकी प्रस्तावित होती.

तसेच मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरांच्या अंतर्गत भागातून मेट्रोचा मार्ग आखण्यात आला होता. त्याचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच भूमिगत मार्गाचा विचार सोडून देण्याची सूचना दिल्ली मेट्रो महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती ‘एमएमआरडीए’मधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

नव्या आराखडय़ात खर्चाची बचत

राज्य सरकारने मेट्रो मार्गाची तपासणी करण्याकरिता, तसेच पुनíवलोकन करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाची नियुक्ती केली आहे. याशिवाय सविस्तर प्रकल्प अहवाल अद्ययावतीकरणाचे कामही महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात असून वडाळा-घाटकोपर-ठाण्यादरम्यान हा मार्ग पूर्णत: उन्नत असावा, यावर महामंडळातील तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. या नव्या अहवालानुसार उन्नत मेट्रो प्रकल्पाची अंदाजे किंमत १२ हजार कोटीपर्यंत असेल, असा दावा दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने केला आहे. तसेच, उपनगरांमधील अंतर्गत भागांऐवजी महामार्गावरून हा प्रकल्प राबविल्यास तो वेगाने पूर्ण होऊ शकतो, असेही महामंडळाचे मत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane metro will be a underground
First published on: 21-01-2016 at 04:09 IST