मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आंनद नगर – साकेतदरम्यान उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन वेळा निविदा मागविल्यानंतरही या प्रकल्पासाठी सल्लागार मिळू शकलेला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे. परिणामी, या प्रकल्पास विलंब होण्याची चिन्हे आहेत.

पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाण्यात येणाऱ्या आणि पुढे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एमएमआरडीएने आंनद नगर – साकेतदरम्यान उन्नत रस्ता प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या उन्नत मार्गासाठी अंदाजे सुमारे १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सुमारे ६.३० किमी लांबीच्या आणि सहा (येण्यासाठी तीन, जाण्यासाठी तीन) मार्गिकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पाला २१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : मुंबई विमानतळावर ८० कोटींचे ड्रग्ज जप्त; DRI ची मोठी कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता डिसेंबर २०२१ मध्ये निविदा मागविण्यात आल्या. बांधकाम निविदापूर्व प्रक्रिया राबविण्यासह प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या सल्लागारावर असणार आहे. मात्र दोन वेळा मागविण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरडीएला सल्लागाराची नियुक्ती करता आलेली नाही. एमएमआरडीएने आता तिसऱ्यांदा निविदा मागविली असून इच्छुकांना १८ ऑक्टोबरपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.