मुंबई : अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत, प्रदेश काँग्रेसमध्ये महत्त्वाचे स्थान पटकावलेल्या तसेच पक्षश्रेष्ठींची मर्जी संपादन केलेल्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच कुटुंबीयांनी धोका देत त्यांची राजकीय कोंडी केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही ती नाकारणे व मुलाला उमेदवारी अर्ज भरायला लावणे, भाजपचा जाहीरपणे पाठिंबा मागणे, ही बंडखोरीच असून तांबे पिता-पुत्रांवर कारवाई केली पाहिजे, असे पक्षात बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे चौथ्यांदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने अखिल भारतीय काँग्रेस समितीने गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळीच अधिकृतपणे त्यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र काही क्षणातच सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे डॉ. सुधीर तांबे हे मेहुणे आहेत. सत्यजित तांबे त्यांचे पुत्र व थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजित हे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. तांबे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. या वेळीही त्यांनी उमेदवारी मागितली होती व त्याला पक्षात फारसा कुणाचा विरोध नव्हता. त्यानुसार त्यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली; परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी वेगळेच राजकीय नाटय़ घडले. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही, त्यांच्याऐवजी सत्यजित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, इतकेच नव्हे तर, त्यांनी भाजपचा जाहीरपणे पािठबा मागितला, त्यामुळे पक्षाला आणि विशेषत: बाळासाहेब थोरात यांना धक्का बसल्याचे सांगितले जाते.

थोरातांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात विधानसभा निवडणुकीत पक्षाची स्थिती फार सुधारली नाही, परंतु रसातळाला जाण्यापासून वाचली, दोन आमदारांची भर पडली. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करून, पक्षाने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली. राज्यात महाविकास आघाडी उभी करण्यात थोरात यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील भारत जोडो पदयात्रेचीही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती व त्यांनी ती पार पाडली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची मर्जी संपादन करण्यात थोरात यशस्वी ठरले होते.

पक्ष योग्य तो निर्णय घेईल : अतुल लोंढे
नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी दिली होती, त्यांनी ती नाकारली, त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The family members of balasaheb thorat revolted amy
First published on: 13-01-2023 at 04:23 IST