मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर देशात विनावातानुकूलित अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाली. तसेच, आता ही एक्स्प्रेस मुंबई आणि बिहारला जोडणार आहे. मध्य रेल्वेवरील पहिली अमृत भारत एक्स्प्रेस मे महिन्यापासून सुरू होईल. या नव्या धाटणीच्या एक्स्प्रेसमुळे उत्तर भारतीय प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान होणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस – सहरसा (बिहार) अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी साप्ताहिक असेल. गाडी क्रमांक ११०१५ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २ मेपासून दर शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २ वाजता सहरसा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ११०१६ सहरसा येथून ४ मेपासून दर रविवारी पहाटे ४.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्जापूर, पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपूत्र, सोनपूर, हाजीपूर जंक्शन, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, हसनपूर रोड, सलौना आणि खगडिया जंक्शन येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला ८ शयनयान क्लास, ११ सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार आणि २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होईल. अतिजलद एक्स्प्रेससाठी लागू असलेल्या शुल्कासह अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे यूटीएसद्वारे आरक्षित करता येतील.
अमृत भारत एक्स्प्रेस ही अत्याधुनिक प्रकारची रेल्वेगाडी आहे. या रेल्वेगाडीला एलएचबी डबे असून पुश-पुलची सुविधा देण्यात आली आहे. पुश आणि पुलद्वारे रेल्वेगाडीच्या दोन्ही टोकांना इंजिन बसविण्यात आल्याने, घाटात बॅंकर जोडण्याची आवश्यकता नसते. यासह आपत्कालीन ब्रेक देखील तत्काळ लावता येणे शक्य आहे. ही रेल्वेगाडी ताशी १३० किमी कमाल वेगाने धावू शकते.
ही रेल्वेगाडी सर्वसामान्य प्रवाशांना कमी भाड्यात चांगल्या सुविधा, आराम आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा अनुभव देणार आहे. ही ट्रेन विशेषतः मध्यमवर्गीय आणि सामान्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या रेल्वेगाडीचे डबे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहेत. अमृत भारत ट्रेन आकर्षक असून, प्रवाशांना महागड्या रेल्वेगाडीसारखा अनुभव देते. सामान्य प्रवाशानाही आरामदायी प्रवास घडू शकेल, असा विश्वास वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला