लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः विरुद्ध दिशेने येणारी रिक्षा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला आरोपी रिक्षाचालकाने रिक्षासोबत फरफटत नेल्याची घटना घाटकोपर पूर्व येथे घडली. या घटनेत पोलीस नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी पोलिसावर फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हर्षल चौधरी हे घाटकोपर येथे तैनात होते. त्यावेळी हवेली पुलाजवळून एक रिक्षा विरुद्ध दिशेने येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रिक्षाची लोखंडी सळी पकडली आणि चालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. पण रिक्षाचालकाने रिक्षा थांबवण्याऐवजी गती वाढवली. त्यामुळे चौधरी रिक्षासोबत फरफटत पुढे गेले. तरीही रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली नाही.

हेही वाचा… मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षाचा वेग अधिक असल्यामुळे चौधरी बाजुला फेकले गेले आणि ते जखमी झाले. चौधरी यांच्या डोक्याला, छाती व पायालाही जखमा झाल्या असून याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जखमी करणे अशा विविध कलमांतर्गत रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपी रिक्षाचालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तक्रारदार चौधरी यांच्यावर फोर्टीज रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.