मुंबई : मध्य रेल्वेवरील सर्वच स्थानकात प्रचंड गर्दीमय झाले असून, लोकलमधील गर्दीच्या नियोजनावर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दररोज एक ते दोन प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. तसेच गेल्या अनेक कालावधीपासून डोंबिवली ते ठाणे दरम्यान लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी मुंब्रा येथील घडलेल्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा येथे प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे मंडळाला जाग झाल्याने प्रवाशांनी रेल्वे मंडळाच्या उशिरा घेतलेल्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

उपनगरीय लोकलमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून दरवाज्यावर उभे राहतात. यामध्ये काही प्रवाशांना धावत्या लोकलमधून पडून किंवा रेल्वेचा खांब लागून मृत्यू होतो. अशा घटना दररोज होत असताना देखील ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परंतु, मुंब्रा येथे दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू आणि ९ प्रवासी जखमी झाल्यानंतर रेल्वे मंडळाने वातानुकूलित लोकलप्रमाणे सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवरील दिवा-मुंब्रा स्थानकाजवळ २३ एप्रिल २०२४ रोजी धावत्या लोकलमधून पकडून अवधेश दुबे (२५) यांचा मृत्यू झाला होता. गर्दीने भरलेल्या लोकल, प्रवाशांकडून दरवाजा अडवणे, लोकलला उशीर धावणे आणि विलंबित वैद्यकीय प्रतिसाद यासारख्या समस्यांमुळे अवधेशचा मृत्यू झाल्याची खंत त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

डिसेंबर २०१९ रोजी पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलप्रमाणे विनावातानुकूलित लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात प्रवाशांसाठी उपयोगात येईल, यात शंका होती. त्यामुळे लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा पश्चिम रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न फक्त ‘प्रयत्न’च राहिला होता. त्यावेळी मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये सिमन्स प्रकारातील लोकलच्या तीन डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले होते. परंतु, विनावातानुकूलित लोकलमध्ये दरवाजा बंद केल्यामुळे प्रवाशांची आतमध्ये घुसमट होत होती. त्यामुळे दरवाज्याची उघडझाप करण्यासाठी वेळ आणि प्रवाशांमुळे काही वेळा दरवाजा बंद किंवा उघडण्यास येणाऱ्या अडचणी याामुळे हा प्रयत्न त्यावेळी अयशस्वी ठरला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकलच्या पायदानावरून दरवाज्याला लटकून प्रवासी प्रवास करत होते. यावेळी प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने, ते खाली पडले. ही घटना सकाळी ९.३० वाजता घडली. त्यानंतर सकाळी ९.५० वाजता रुग्णवाहिका तिथे पोहोचली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लोकलमध्ये बसविण्यात येणार आहेत. २३८ नव्या वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत. तसेच आयसीएफद्वारे ज्या लोकल आहेत. त्यांना रेट्रो फिट माध्यमातून दरवाजे लावण्यात येणार आहेत. – स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे