मुंबई: दहिसरच्या आर उत्तर विभाग कार्यालयाला स्वतःची इमारत नसल्यामुळे करनिर्धारण व संकलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही अशी अवस्था आहे. या विभागासाठी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या इमारतीतील एक सभागृह द्यावे अशी मागणी करनिर्धारण विभागाने केली आहे. मात्र हे कार्यालय इथे हलवल्यास दहिसरच्या नागरिकांना बोरिवलीपर्यंत हेलपाटा घालावा लागणार आहे. त्याच वेळी नाट्यगृहाच्या इमारतीतील एक सभागृह नागरिकांसाठी कायमचे बंद होणार आहे.

दहिसरच्या विभाग कार्यालयाचे विभाजन होऊन वीस वर्षे झाली तरी आर उत्तर विभाग कार्यालयाला हक्काची इमारत देण्यात मुंबई महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे सध्या हे कार्यालय मुंबई महापालिकेच्याच प्रसुतिगृहाच्या इमारतीत सुरू आहे. मात्र या इमारतीत पुरेशी जागा नसल्यामुळे करनिर्धारण व संकलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दहिसरच्या पुलाखाली कार्यालयासाठी जागा देण्यात आली होती.

मात्र आता या कार्यालयासाठी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील एक सभागृह द्यावे अशी मागणी करनिर्धारण व संकलन विभागाने प्रशासनाकडे केली आहे.प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या ए इमारतीमध्ये कार्यालय, सभागृह, बाल्कनी, सभागृह, मिनी थिएटर, तर बी इमारतीमध्ये नाट्यगृह आणि कर्मचारी निवास आहेत.

तर सी इमारतीमधील पहिल्या दोन मजल्यावरील सभागृह, तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिका आहे. सी इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सभागृह या कार्यालयासाठी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र हे सभागृह लग्नसमारंभासाठी, तसेच अनेक शालेय कार्यक्रमांसाठी दिले जाते. हे सभागृह कार्यालयाला दिले तर लोकांसाठी ही सुविधा कायमची बंद होईल, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच दहिसरच्या नागरिकांना मालमत्ता कराविषयी कामासाठी बोरिवलीपर्यंत यावे लागणार आहे. त्यामुळे लोकांचा या कार्यालयाला विरोध आहे.

दरम्यान, आर उत्तर विभागाची इमारत बांधून पूर्ण झाली की आमचे कार्यालय आम्ही तिथे हलवू. मात्र तोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना बसायला तिथे जागा मिळावी अशी मागणी असल्याचे करनिर्धारण व संकलन विभागाचे म्हणणे आहे. परंतु, एसआरएचा विकासक आर उत्तर विभागासाठी इमारत बांधून देणार होते. मात्र हे प्रकरण वादात सापडल्यामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे आर उत्तर विभागाला अद्याप हक्काची इमारत मिळालेली नाही. ती कधी मिळेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात करनिर्धारणचे कार्यालय हलवण्यास स्थानिकांचा विरोध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहिसरच्या आर उत्तर विभाग कार्यालयाला जागा नसल्यामुळे करनिर्धारण व संकलन विभागाचे आधीचे कार्यालय दहिसरच्या पुलाखाली होते. मात्र या कार्यालयात पावसाळ्यात पाणी गळते. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजत होती. गळक्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसावे लागते. त्यामुळे करनिर्धारण व संकलन विभागाच्या कार्यालयाला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहाच्या इमारतीत जागा द्यावी अशी आमच्या विभागाची मागणी आहे. – विश्वास शंकरवार, उपायुक्त, मुंबई महानगरपालिका.