मुंबई : देवनारमधील पशुवधगृहातील विक्रेत्यांना ऑनलाईन पैसे पाठवल्याचा संदेश दाखवून बकरे घेऊन पळणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला देवनार पोलिसांनी मंगळवारी अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने बनावट आधारकार्डही तयार केले होते. ते पाठवून तो विक्रेत्यांचा विश्वास संपादन करीत होता. आरोपीने अशा प्रकारे फसवणूक केल्याचे सहा गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
यासीन उर्फ समीर रेहमान शेख (३५) असे अटक आरोपीचे नावे आहे. तो मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड येथे वास्तव्यास होता. मानखुर्द येथील पशुवधगृहात शनिवारी बकऱ्या विक्रीसाठी विशेष बाजार भरतो. त्यामुळे १२ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रारदार विक्रेत्याने त्याच्याकडील बकरे विक्रीसाठी नेले होते. आरोपी दुपारी तेथे आला. त्याला तक्रारदार व्यावसायिकाकडील एक बकरा आवडला. या बकऱ्याची किंमत १५ हजार रुपये ठरली. त्यानंतर आरोपीने आपले एटीएम चालत नसल्याची बतावणी तक्रारदाराला केली. तसेच आपल्याला पैशांची गरज असून रोख सात हजार रुपये द्यावे आणि त्या बदल्यात बकऱ्याचे १५ हजार व रोख घेतलेले सात हजार रुपये असे मिळून एकूण २२ लाख रुपये एनईएफटीद्वारे ऑनलाईन पाठवतो, असे आरोपीने तक्रारदारांना सांगितले.
हेही वाचा >>> मध्य रेल्वेने वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ
तक्रारदारांनी त्याच्या मुलाचे बँक खाते व मोबाइल क्रमांक देऊन ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर त्याची माहिती संबंधित मोबाइल क्रमांकावर पाठवण्यास सांगितली. आरोपी शेखने एनईएफटीद्वारे तक्रारदारांच्या बँक खात्यावर रक्कम पाठवल्याचा संदेश संबंधित मोबाइल क्रमांकावर पाठवला. तसेच रक्कम एका तासाने खात्यावर जमा होईल असे शेख सांगितले. विक्रेत्याचा विश्वास संपादन करण्यासाठी शेखने स्वतःच्या आधारकार्डचे छायाचित्र त्यांच्या मोबाइलवर पाठवले. त्यावर यासिन शेख असे नाव व शिवाजी नगर येथील पत्ता नमुद करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी बकरा घेऊन गेला. पण एक दिवस उलटल्यानंतरही तक्रारदाराच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे विक्रेत्याने आधारकार्डवरील नमुद पत्त्यावर शोध घेतला असता आरोपी तेथे राहत नसल्याचे उघडकीस आले. अखेर विक्रेत्याने याप्रकरणी देवनार पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणातील आरोपीला नुकतीच अटक करण्यात आली. त्याचे खरे नाव समीर रेहमान असल्याचे उघड झाले आहे. आरोपीविरोधात नवघर, कुर्ला, कांजूरमार्ग, मुलुंड व देवनार पोलीस ठाण्यात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत.