मुंबई : मुंबईसह ठाणे पालघर आणि भागात येत्या रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तविली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोकण, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांत शनिवारपासून १० मेपर्यंत ढगाळ वातावरण राहील, तसेच या कालावधीत काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच संपूर्ण दिवस ढगाळ वातावरणही राहील. मुंबई बरोबरच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत रविवारपासून हलक्या सरींचा अंदाज आहे. मुंबई आणि ठाणे येथे रविवारी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे येथे सोमवारी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत मुंबईत संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहील त्यामुळे तापमानात घट होईल.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३४.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सांताक्रूझ येथे तापमानात किंचीत वाढ झाली होती. दरम्यान, या वातावरणाचा प्रभाव विशेष करून विदर्भात जाणवेल. यावेळी या भागात गारपीटीचीही शक्यता आहे.

तापमान कसे राहणार

सध्या राज्यात काही भागात तापमानाचा पारा ४० अंशापार गेला आहे. जळगाव, जेऊर, सोलापूर, अकोला, अमरावती, वर्धा या भागात सातत्याने कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पुढे नोंदला जात आहे. शनिवारपासून राज्यातील तापमानात २ ते ३ अंशांनी घट होईल. यामुळे राज्यात उन्हाचा ताप कमी होईल.

उष्णतेची लाट व उकाडा

संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले.

अवकाळीचे वातावरण कशामुळे

अरबी समुद्रात दीड किमी उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल झाला आहे.

अकोला येथे सार्वाधिक तापमान

राज्यात शुक्रवारी अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येथे ४४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अमरावती ४३.४ अंश सेल्सिअस, बुलढाणा ४१.४ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४२.२ अंश सेल्सिअस, वाशिम ४२.४ अंश सेल्सिअस, यवतमाळ ४२.६ अंश सेल्सिअस, लोहगाव ४३.२ अंश सेल्सिअस, पुणे ४०.२ अंश सेल्सिअस आणि सोलापूर येथे ४४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.