सुशांत मोरे
सार्वजिनक वाहतूक सुरळीत आणि वेगाने व्हावी यासाठी मुंबईत पुन्हा एकदा बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा (बीआरटीएस) पर्याय समोर आला आहे. बेस्ट उपक्रमाने हा पर्याय निवडला असून त्यासाठी पश्चिम द्रुतगती मार्गाचा विचार सुरू आहे. या संदर्भात बेस्ट उपक्रम आणि वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा समावेश असलेल्या ‘मुंबई मोबिलिटी फोरम’तर्फे संयुक्तरिक्त्या सर्वेक्षण करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील वाहनांच्या संख्येते प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचा वेग कमी होणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या मुंबईत वाहनांची संख्या ४३ लाखांवर पोहोचली आहे. मुंबईतील वाहनांची संख्या २०११-१२ मध्ये २० लाख २८ हजार ५०० इतकी होती. २०१६ मध्ये ती २६ लाख ९५ हजाराच्या घरात पोहोचली. गेल्या दहा वर्षांत मुंबईतील वाहनसंख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. परिणामी, प्रदुषणाबरोबरच वाहतूक कोंडी, अपुरी वाहनतळे आदी समस्या भेडसावू लागल्या आहेत. पश्चिम उपनगरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परिणामी, बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव, वांद्रे या परिसरात सर्वाधिक वाहतूक कोंडी होत आहे. येथून मुंबई शहराच्या दिशेने मोठ्या संख्येने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनू लागला आहे. याचा फटका मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसत असून बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या कोंडीच्या कचाट्यात सापडत आहेत. थांब्यावर बस वेळेत न पोहोचल्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागते.

लोकल गाड्यांना होणारी गर्दी, वाढते अपघात लक्षात घेता बेस्टची बसगाडी विनाअडथळा धावावी यादृष्टीने मुंबईत बीआरटीएस प्रकल्प राबवून स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली होती. पुणे, गुजरातमध्ये असे प्रयोगही झाले आहेत. आता मुंबईत बीआरटीएसची मुहूर्तमेढ रोवण्याचा विचार सुरू आहे. बेस्ट उपक्रम आणि वाहतूक तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या ‘मुंबई मोबिलिटी फोरम’ने या संदर्भातील सर्वेक्षण हाती घेतले आहे. बेस्ट बसगाड्यांसाठी पश्चिम द्रुतगती मार्गावर स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर यासाठी पूर्व मुक्त मार्गाचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

वाहनांची वाढलेली संख्या आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळेही स्वतंत्र मार्गिकेसाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. याबाबत सध्या नेमके काही सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज आहे. बेस्ट बसचा प्रवास झटपट होईल यादृष्टीने विचार करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत बीआरटीएस योजना राबविण्याचा विचार सुरू आहे. ही योजना मुंबईत राबविण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती ‘मुंबई मोबिलिटी फोरम’चे सदस्य अशोक दातार यांनी दिली.

सध्या मुंबईतील निरनिराळ्या मार्गांवर बेस्टच्या तीन हजार ६८० बस धावत असून यामधून दररोज ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. भविष्यात बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या १० हजारापर्यंत वाढविण्याचा उपक्रमाचा मानस आहे. तसेच लवकरच बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही ४० लाखांपार जाईल, असा विश्वास बेस्टकडून व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, बेस्ट उपक्रम आणि मुंबई मोबिलिटी फोरम स्वतंत्र मार्गिकेसाठी प्रयत्नशील आहेत.