मुंबई : मुंबईत यंदा पावसाने सर्वसामान्य हवामान पद्धतींच्या अनुमानांना छेद देत मे महिन्यातच जोरदार हजेरी लावली. मुंबईत १ ते २७ मे या कालावधीत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे.सामान्यत: जूनमध्ये मोसमी पाऊस दाखल होतो आणि पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. यानुसार सुरुवातीपासूनच मुंबईत हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. काही वेळा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.

मोसमी पाऊस मुंबईत दाखल होण्याअगोदर पावसाने जोर धरला होता. दरम्यान, १ ते २६ मे रोजी सकाळी ८ पर्यंत २९४.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. २६ मे सकाळी ८ पासून ते २७ मे सकाळी ८ पर्यंत म्हणजेच २४ तासांत हवामान विभागाच्या दोनही केंद्रांवर मिळून ३०६.१ मिमी पावसाची नोंद झाली. अशाप्रकारे १ ते २७ मे दरम्यान मुंबईत एकूण ६००.१ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत जून महिन्यात सरासरी ५०० मिमीच्या आसपास पाऊस अपेक्षित असतो. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मेदरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सामान्यत: मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होतो. यंदा मात्र मोसमी पाऊस अंदाजित वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तळकोकणात मोसमी पावसाचे आगमन झाले आणि सोमवारी मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला. साधारण १५ दिवस अगोदरच मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाला. दरम्यान, मे महिन्यात पडलेल्या पावसाने जूनमधील सरासरी ओलांडली आहे. आता जूनमध्ये किती पडेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कमी तापमानाची नोंद

मुंबईत सोमवारी मागील दहा वर्षांतील कमी कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे २६.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे २८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. यापूर्वी १८ मे २०२१ रोजी कुलाबा येथे २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे २६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी पावसाचा जोर कमी

मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच पावसाचा जोर ओसरला. दिवसभर काही भागात हलक्या सरी बरसल्या. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी सायंकाळी ५.३० पर्यंत १६.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १.२ मिमी पावसाची नोंद झाली.