मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकातील तिकीट तपासणी कार्यालयातील मालमत्तेचे विनातिकीट प्रवाशाने नुकसान केले. मॉनिटर, सीपीयू, कीबोर्डची तोडफोड केली. तसेच, या भांडणात रेल्वे कर्मचारी आणि स्वतः प्रवासी जखमी झाला. सदर विनातिकीट प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
दादर – विरार जलद लोकलमध्ये शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास कर्तव्यावर असलेले उपमुख्य तिकीट निरीक्षक (सीटीआय) शमशेर इब्राहिम नियमित तिकीट तपासणी करीत होते. तपासणीदरम्यान प्रथम श्रेणीच्या डब्यात तीन प्रवाशांकडे द्वितीय श्रेणीचे तिकीट आढळले. पुढील तपासणीत, अंधेरी – बोरिवलीदरम्यान एक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळले. या प्रवाशांना बोरिवली स्थानकावर उतरवण्यात आले. त्यानंतर, प्रवाशांना तिकीट तपासनीसांच्या कार्यालयात नेण्यात आले.
विनातिकीट प्रवाशाने रेल्वे मालमत्तेचे केले नुकसान
तिकीट तपासनीस कार्यालयात नेण्यात आलेल्या तिघांपैकी एक प्रवासी कमालीचा संतप्त झाला होता. हा प्रवासी आक्रमक झाला आणि त्याने रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केले. कार्यालयातील मॉनिटर, सीपीयू उचलून जमिनीवर आपटले. कीबोर्ड टेबलावर आपटून त्याचे तुकडे केले. तसेच इतर रेल्वे मालमत्तेचेही त्याने नुकसान केले.
रेल्वे कर्मचारी, प्रवासी जखमी
या भांडणात रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी दोघेही जखमी झाले. दोघांनाही तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास
पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम
पश्चिम रेल्वेवरून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या तिकीट विक्रीवर, पर्यायाने महसुलावर परिणाम होतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. तसेच, काही वेळा रेल्वे स्थानकात ‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम राबवली जाते. रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, स्थानकाचे प्रवेशद्वार, फलाटांवर तिकीट तपासणीस, आरपीएफ जवान तिकीट तपासणी मोहीम राबवतात.