मुंबई : सकाळपासून पावसाची संततधारा सुरू असल्याने, रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. परिणामी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाला कार्यालयीन स्थळी पोहोचण्यास विलंब झाला.
गणेशोत्सवानिमित्त सुट्टी घेतलेल्या नोकरदार वर्गाची सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस भरून काढण्यासाठी लगबग सुरू आहे. या दोन दिवसात सुट्टीतील कामे करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु, सोमवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक सेवा कोलमडली. रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि लोकल सेवेचे तीनतेरा वाजल्याने नोकरदार वर्ग कार्यालयात उशिरा पोहोचले. त्यामुळे सायंकाळपर्यंत जादा वेळ काम कर्मचाऱ्यांना करावे लागण्याची चिन्हे आहेत.
मध्य रेल्वेवरून दररोज सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. महत्त्वाच्या स्थानकात ३ ते ४ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. मध्य रेल्वेच्या दिवस भरातल्या एकूण प्रवाशांपैकी सकाळी आणि सायंकाळी ८३ टक्के प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या लोकल नियोजित वेळेच्या २५ ते ३० मिनिटे उशिराने लोकल धावत असल्याने, सकाळी लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. भरगच्च लोकलमध्ये प्रवाशांना शिरणे अवघड झाले होते. त्यामुळे प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागला. लोकल विलंबाने येत असल्याने, एका लोकलमध्ये दोन ते तीन लोकलमधील प्रवाशांची गर्दी एकत्र होत होती.
परिणामी, काही प्रवाशांनी जीव धोक्यात घालून लोकल प्रवास केला. कसारा, टिटवाळा, कर्जत, बदलापूर, कल्याण, ठाणे, पनवेल, वाशी येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल १० ते १५ मिनिटे, २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकात गर्दी झाली होती.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सकाळपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. दादर, कुर्ला, शीव, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, वांद्रे, अंधेरी, बोरिवली येथे जोरदार पाऊस पडला. रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने, लोकलचा वेग कमी करण्यात आला. त्यामुळे लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. कल्याण ते सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने, कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना विलंबयातना सहन करावी लागली.