मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर गत पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी रात्रीपासून आंदोलकांची वाहने मुंबई बाहेर जावू लागली होती. मंगळवार दुपारपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील गर्दी कमी ओसरली होती. ब्रह्न्मुंबई महापालिका चौकातील वाहतूकही दुपारनंतर सुरू झाली होती. आझाद मैदानाशेजारील रस्ताही खुला झाला होता.
उच्च न्यायालयाने आझाद मैदानाबाहेरील गर्दी कमी करा. आंदोलकांनी अडविलेले चौक, रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळित करण्याचे आदेश राज्य सरकार आणि पोलिसांना दिले होते. त्यानंतर सोमवारी रात्रीपासूनच आंदोलकांची वाहने मुंबई बाहेर जाण्यास सुरुवात झाली होती. सीएसटीवरील गर्दी मंगळवारी सकाळी पूर्णपणे ओसरली होती. काही आंदोलक फलाटावर झोपलेले दिसून आले. पण, त्यांची संख्या खूप कमी होती. तिकट घराशेजारील मोकळ्या जागेत चार दिवसांपासून आंदोलकांनी ठाण मांडले होते, तो परिसरही मोकळा झाला होता.
ब्रह्न्मुंबई महापालिका चौकातील वाहतूक गत चार दिवसांपासून विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी चौकात वाहने लावून ठिय्या मारला होता. रात्रीपासून वाहने निघून जाण्यास सुरुवात झाली होती. मंगळवारी दुपारपर्यंत चौकातील वाहतूक सुरळित झाली होती. आझाद मैदान ते अलेक्झाड्रिया स्कूल पर्यंतचा रस्ता बंद होता. या रस्त्यावर आंदोलकांची वाहने उभी होती, दुपारी दोन नंतर पोलिसांनी पुढाकार घेऊन, शांततेत वाहने पुढे काढून दिली. त्यामुळे तीनच्या सुमारास आझाद मैदान ते अलेक्झाड्रिया स्कूल रस्ता वाहनांसाठी मोकळा झाला होता.
आंदोलनामुळे दक्षिण मुंबई आणि प्रामुख्याने ब्रह्न्मुंबई महापालिका चौकात गत चार दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पण, उच्च न्यायालयाचा आदेश आणि जरांगे यांच्या सूचनेमुळे आंदोलकांची वाहने निघून गेल्यामुळे आणि आंदोलकांनी रस्ते, चौक मोकळे केल्यामुळे चार दिवसांनंतर बंद असलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.