मुंबई : दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे देशातील पहिलाच आदिवासी औद्योगिक समूह उभारण्यात येत आहे. ७५ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या औद्योगिक समूहात फक्त आदिवासी तरुण, आदिवासी महिला आणि आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी भाडेतत्त्वावर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आदिवासी विकास विभाग, उद्योग विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने संयुक्तपणे जांबुटके येथील आदिवासी औद्योगिक समूह प्रकल्प उभारला जाणार असून, हा राज्यासह देशातील पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा आदिवासी विभागाने केला आहे. हा प्रकल्प प्लग अॅण्ड प्ले प्रारुपावर आधारित आहे. या अंतर्गत आदिवासी समाजातील होतकरु उद्योजकांना तसेच कौशल्य संपादन केलेल्या नव उद्योजकांना, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योग सुरू करण्यासाठी सर्व पायाभूत सोयी – सुविधांनी सुसज्ज असलेले औद्योगिक शेड भाडेतत्वावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

प्रकल्पासाठी आदिवासी विकास विभागाकडून पायाभूत सुविधांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे. उद्योग विभागामार्फत महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा अंतर्गत संबंधित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे, तर जलसंपदा विभागाकडून ०.६२ दलघमी पाणी वापरण्यास मंजुरी मिळाली आहे. महसूल विभागाकडून विना अट २९.५२ हेक्टर क्षेत्र उद्योग विभागास हस्तांतरित केल्यामुळे अकृषक कराचा भारही कमी झाला आहे.

प्रकल्पात नेमकं काय असेल

  • महिला बचत गट, आदिवासी समाजातील कारागीर तसेच शेतकऱ्यांद्वारे निर्मित वस्तूंच्या विक्रीसाठी जागा
  • आदिवासी तरुणांच्या कौशल्य वृद्धीसाठी कौशल्य विकास केंद्र
  • आदिवासी समाजाची संस्कृती जतन करण्यासाठी प्रदर्शन, विक्री केंद्र
  • आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, अन्न पदार्थ, श्रीअन्न, अन्नधान्यांची विक्रीची खास व्यवस्था
  • खास आदिवासी अन्न पदार्थांच्या भोजन व्यवस्था

प्रकल्पाचे ठिकाण औद्योगिकदृष्ट्या सोयीचे

आदिवासी औद्योगिक समूहासाठी जांबुटके गावातील ७५ एकर (२९.५२ हेक्टर ) इतकी शासकीय जमीन निश्चित करण्यात आली आहे. हे ठिकाण नाशिकपासून २२ किलोमीटरवर असून, नाशिक – गुजरात राष्ट्रीय महामार्गावर (एनएच ८४८) आहे. या ठिकणापासून प्रस्तावित सुरत – चेन्नई नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग जात आहे, शिवाय ओझरखेड विमानतळही २२ किलोमीटर अंतरावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील सर्व आदिवासी भागांत अंमलबजावणी

दिंडोरीतील जांबुटके येथे दिंडोरीत आदिवासी औद्योगिक समूह उभारण्यात येत आहे. हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. प्रकल्पासाठीच्या सर्व मजूंऱ्या मिळाल्या आहेत, त्यामुळे पुढील आठ महिन्यांमध्ये आदिवासी औद्योगिक समूह सुरू करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यातील सर्व आदिवासी भागांत अंमलबजावणी करू, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.