मुंबई : देशांतर्गत आणि परदेशातून हळद, हळद पूड आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांची मागणी वाढली आहे. गत दोन वर्षांपासून हळदीचे दर प्रति क्विंटल १३ ते १४ हजार रुपयांवर टिकून आहेत. परिणामी देशातील एकूण लागवड यंदा २५ टक्क्यांनी वाढून ३.६० लाख हेक्टरवर पोहचण्याचा अंदाज आहे. सांगली, साताऱ्यात लागवड कमी होऊन विदर्भ, मराठवाड्यात वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा हळदीचे नवे आगार म्हणून समोर येत आहे.
गतवर्षी देशात हळदीचे क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टरवर गेले होते. यंदा त्यात वाढ होऊन ३ लाख ६२ हजार ७६७ हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हळद देशातील पारंपरिक नगदी पीक आहे. दर्जेदार हळदीसाठी सांगळीची बाजारपेठ जग प्रसिद्ध आहे. पण, गत काही वर्षांपासून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील हळदीचे क्षेत्र झपाट्याने कमी होऊन विदर्भ आणि मराठवाड्यात हळदीचे क्षेत्र वेगाने वाढत आहे.
महाराष्ट्रात हळद लागवडीचे क्षेत्र सरासरी ८५ हजार हेक्टर आहे. त्यात यंदा सरासरी २५ टक्के वाढ होऊन १.१० लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हळद लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याचा कल कायम आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातच क्षेत्र वाढ होणार आहे. राज्यातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे ७० टक्के क्षेत्र विदर्भ आणि मराठवाड्यात एकवटले आहे. हिंगोली जिल्हा हळदीचे नवे आगार म्हणून समोर येत आहे.
विविध कारणांमुळे गत वर्षी देशात सात हजार तर राज्यात दीड हजार हेक्टरने क्षेत्र कमी झाले होते. तरीही तेलंगण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या अन्य हळद उत्पादक राज्यांत उत्पादनात वाढ झाल्यामुळे देशाच्या एकूण हळद उत्पादनात फारशी घट झाली नाही.
हळद लागवडीची स्थिती
गतवर्षी २ लाख ९० हजार ९३९ हेक्टरवर लागवड
यंदा ३ लाख ६२ हजार ७६७ हेक्टरवर जाण्याचा अंदाज
महाराष्ट्रातील क्षेत्र ८५ हजार हेक्टरवरून १.१० लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज
महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र विदर्भ, मराठवाड्यात
महाराष्ट्रासह तेंलगाणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश प्रमुख हळद उत्पादक राज्ये
हळदीचे दर दोन वर्षांपासून १३ ते १४ हजार प्रति क्विंटलवर स्थिर आहेत
राज्यासह दक्षिणेत लागवडीला पोषक वातावरण
मे महिन्याच्या मध्यापासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे हळद लागवड लांबणीवर पडली होती. पण, त्यानंतर वेगाने लागवडी पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह दक्षिणेतील निजामाबाद, एरोड, कडपा, दुग्गीराला भागांत हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी २ लाख ९० हजार ९३९ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा २५ टक्के म्हणजे ७२ हजार ३७४ हेक्टरने वाढून ३ लाख ६२ हजार ७६७ हेक्टरवर पोहचण्याचा अंदाज आहे, अशी माहिती सांगली येथील हळद संशोधन केंद्राचे प्रमुख मनोज माळी यांनी दिली.