संचित रजेचा कालावाधी संपल्यानंतर तुरुंगात परत न जाता पळून गेलेल्या दोन आरोपींना धारावी आणि अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. रवी नयनसिंग ठाकूर आणि मोहम्मद आयान करीम शेख अशी या दोघांची नावे आहेत. दोघांनाही चोरीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती.

करोना काळात तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षेसाठी संचित रजा देण्यास सुरूवात करण्यात आली होती. त्याचा फायदा घेऊन बाहेर पडलेले ठाकूर व शेख संचित रजेचा कालावधी संपल्यानंतरही तुरुंगात परतले नाहीत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी जबरी चोरीच्या गुन्ह्यांत मोहम्मद आयानला धारावी पोलिसांनी अटक केली होती, तर रवी ठाकूरला चोरीच्या गुन्ह्यांत एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध वांद्रे आणि अंधेरी येथील न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी पूर्ण होताच या दोघांनाही एक वर्षांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

हेही वाचा: नवाब मलिक यांच्या जामिनावर २४ नोव्हेंबर रोजी निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षा झाल्यानंतर त्यांना नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात पाठविण्यात आले होते. करोना कालावधीत या दोघांनाही ४५ दिवसांच्या संचित रजेवर सोडून देण्यात आले होते. मात्र संचित रजेची मुदत संपल्यानंतर ते दोघेही तुरुंगात परतले नाही. ते दोघेही पळून गेल्याची खात्री होताच त्यांच्याविरुद्ध तुरुंग प्रशासनाच्या वतीने दिलेल्या तक्रार अर्जानंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान रवीला एमआयडीसी आणि मोहम्मद आयानला धारावी पोलिसांनी अटक केली. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या अटकेबाबतची माहिती तुरुंग प्रशासनाला देण्यात आली आहे.