दारूच्या दुकानातून दारू चोरणाऱ्या दोघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. दिपक विजय कनोजिया आणि सुभान माजिद अन्सारी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानातील विविध मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम चोरी केल्याची या दोघांनी कबुली दिली आहे. सागर दिवाकर शेट्टी हे अंधेरीतील शेरे-ए-पंजाबमध्ये राहत असून त्यांचे एन. एस फडके मार्गावर दारुचे दुकान आहे. ११ मे २०२२ रोजी दिवसभरातील काम संपल्यानंतर रात्री दहा वाजता ते दुकान बंद करुन घरी गेले होते.

दुसर्‍या दिवशी ते दुकानात आले असता त्यांना दुकानाचे टाळे तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता चोरट्याने दुकानात प्रवेश करुन दिवसभरातील दोन लाखांची रोख आणि ५० हजार रुपयांच्या विविध मद्याच्या बाटल्या असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे दिसून आले. घरफोडीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता.

हेही वाचा: मुंबई: आणखी एका प्रकल्पावरून वाद; विद्युत उपकरण उद्योग मध्य प्रदेशला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही चित्रीकरणावरून आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी दिपक कनोजिया आणि सुभान अन्सारी या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच दारुच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.