मुंबई : मुंबईत गुरुवारी झालेल्या पडझडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. दहिसरमधील दुर्घटनेत एका दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला, तर कांदिवली येथे एका ३५ वर्षाच्या तरुणाला प्राण गमवावे लागले.

पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी घराच्या पडझडीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील मार्गावरील गल्ली क्रमांक १३ मध्ये एका घरातील खांब मोडल्यामुळे संपूर्ण पोटमाळा खाली कोसळला. पोटमाळ्यावर झोपलेले कुटुंब खाली पडले. या दुर्घटनेत दीड वर्षाच्या अर्जुनच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे त्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा – आरोग्य विभागाच्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ महिनाभरात सव्वादोन लाख रुग्णांवर उपचार!

कांदिवली पूर्व येथे अशोक नगरमधील तेलुगु समाज सोसायटीच्या वसाहतीत शौचालयाच्या छताचा भाग कोसळला. या दुर्घटनेत किसन दुल्ला (३५) जखमी झाले. त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.