मुंबई : वरळीच्या हाजी अली समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास अस्थी विसर्जन करण्यासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर एकाला वाचविण्यात यश आले. त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वरळी येथील हाजी अली समुद्रकिनाऱ्यावरील लोटस जेटी येथे काही जण शनिवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास अस्थी विसर्जन करण्यासाठी गेले होते. त्यापैकी तीन जण समुद्रात बुडाले. त्यांना स्थानिक मच्छिमार आणि पोलिसांच्या मदतीने वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिघांपैकी संतोष विश्वेशर (५४), कुणाल कोकाटे (४५) यांचा मृत्यू झाला, तर संजय सरवणकर (५८) यांना वाचविण्यात यश आले. सरवणकर यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती ताडदेव पोलिसांनी दिली.
पावसाळा सुरू झाला असून समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.