मुंबई : प्रवासी, तसेच वाढती गुन्ह्यांची संख्या लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि आसनगाव या दोन नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या दोन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रादेशिक विभागातील विकासामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या वाढत आहे. मध्य- हार्बर रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत. परिणामी, गुन्हेगारी वाढत असून रेल्वे पोलिसांवर कायदा सुव्यस्था राखणे, प्रवाशांना सुरक्षा पुरवणे तसेच गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्याचा ताण वाढत आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि आसनगाव या दोन नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वेचे पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे आणि मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांच्या हस्ते शुक्रवारी या नव्या पोलीस ठाण्यांचे उद््घाटन करण्यात आले.
अशी आहे नव्या पोलीस ठाण्यांची रचना
वडाळा, कुर्ला आणि वाशी पोलीस ठाण्याचे विभाजन करून लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस (एलटीटी) पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला (हार्बर), टिळक नगर, चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द या सहा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस पोलीस ठाण्यात जब्बार तांबोळी यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे विभाजन करून आसनगाव पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. त्यात टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, खर्डी, उंबरमाळी आणि कसारा या नऊ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्यात सचिन मोरे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
दादर, पनवेल पोलीस ठाण्याची नवीन इमारत
दादर आणि पनवेल पोलीस ठाण्यांचे नूतनीकरण केलेल्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा पोलीस महासंचालकांच्या हस्ते पार पडला.
गुन्हेगारीवर नियंत्रण
वाढत्या लोकसंख्येमुळे चार नव्या पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावाला नुकतीच गृहविभागाने मान्यता दिली होती. त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, भाईंदर आणि अंबरनाथ या पोलीस ठाण्यांचा समावेश होता. उर्वरित दोन पोलीस ठाणी लवकरच तयार केली जाणार असल्याचे पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी सांगितले. या नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असून प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी व्यक्त केला.