अजूनही ३० टक्के उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन शिल्लक

तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या (टीवायबीकॉम) एकूण उत्तरपत्रिकांपैकी केवळ ७० टक्के उत्तरपत्रिकांचेच मूल्यांकन मुंबई विद्यापीठाने आजपावेतो पूर्ण केल्याने परीक्षा संपून ६२ दिवस झाले तरी या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांच्या दृष्टीपथात नाही.

मुंबई विद्यापीठाची टीवायबीकॉमची परीक्षा १० नोव्हेंबरला संपली. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम ७२ नुसार परीक्षा संपल्यानंतर निकाल कमीत कमी ३० आणि जास्तीत जास्त ४५ दिवसांत जाहीर होणे बंधनकारक आहे. परंतु, यंदा केवळ टीवायबीकॉमच नव्हे तर सर्वच विषयांच्या परीक्षांच्या आयोजनापासूनच विद्यापीठाचे नियोजन ठेपाळल्यामुळे ६० हून अधिक दिवस उलटले तरी टीवायबीए, टीवाबीकॉमचा निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन जवळपास पूर्ण होत आले आहे, असे कुलगुरू संजय देशमुख यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र, टीवायबीकॉमच्या साडेचार लाख उत्तरपत्रिकांपैकी आजपावेतो केवळ तीन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली. त्यातल्या त्यात टीवायबीएचे अर्थशास्त्र आणि इतिहास हे विषय वगळता इतर विषयांच्या तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण होत आले आहे. मात्र, टीवायबीकॉमच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम रखडल्याने निकाल कधी लागणार याची काहीच शाश्वती नाही.

विद्यापीठांचे निकाल नेहमीच लांबतात. परंतु, यंदा विद्यापीठाच्या परीक्षाही लांबल्या. एरवी दिवाळीपूर्वी पाचव्या सत्राची परीक्षा आटोपते. त्यामुळे, दिवाळीच्या सुट्टीत उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊन सहावे सत्र सुरू झाल्यानंतर विद्यापीठाला लगेचच निकाल जाहीर करता येतो. परंतु, यंदा परीक्षा लांबल्याने दिवाळीच्या सुट्टीत उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी वर्गावर शिकविण्याबरोबरच प्राध्यापकांना मूल्यांकनालाही वेळ द्यावा लागत आहे. आतापर्यंत केवळ टीवाबीएस्सीचा निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. तोही ६० दिवसांहून अधिक काळ रखडला होता. परंतु, इतर विषयांच्या मूल्यांकनाचे काम रडतखडत सुरू असल्याने जानेवारी संपत आला तरी निकाल दृष्टीपथात नाही.

टीवायबीकॉमला विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्राध्यापक कमी आहेत. त्यातच टीवायबीकॉमशी संबंधित फायनान्शिअल मार्केट, बँकिंग आदी अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिकाही टीवायबीकॉमच्या प्राध्यापकांनाच तपासाव्या लागतात. दरवर्षी साधारणपणे ८० हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे कामही प्रचंड असते. या सर्व कारणांमुळे टीवायबीकॉमचे मूल्यांकनाचे काम लांबते.

टीवायबीएचा निकाल पुढील आठवडय़ात?

निकालांना होणाऱ्या विलंबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांना विचारले असता त्यांनी टीवायबीकॉमच्या मूल्यांकनाचे काम अद्याप बाकी असल्याचे सांगितले. मात्र टीवायबीएच्या मूल्यांकनाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून पुढील आठवडय़ात निकाल जाहीर करू, अशी माहिती त्यांनी दिली.