मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले असून यंदा या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता दीपोत्सवाला प्रथमच उद्धव ठाकरे हजेरी लावणार असल्यामुळे यंदाचा दीपोत्सव ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या शिवाजी महाराज पार्कमध्ये १७ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. १७ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असल्याची माहिती मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

तरुण-तरुणींमध्ये या दीपोत्सवाचे प्रचंड आकर्षण असून या ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होत असते. या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला दरवर्षी विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध मंडळी हजेरी लावतात. यंदा या उत्सवास प्रथमच उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीही या दोन बंधूंच्या पक्षाची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमधील भेटीगाठीही वाढल्या आहेत. गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. तर गेल्याच आठवड्यात राज ठाकरे सहपरिवार मातोश्री निवासस्थानी गेले होते. त्यामुळे या दोन बंधूंमधील राजकीय संबंधांबरोबरच कौटुंबिक संबंधही दृढ होऊ लागले आहेत. आता यंदाच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, यंदा दीपोत्सवाचा कालावधी कमी करण्यात आल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. दरवर्षी तुळशी विवाहापर्यंत दीपोत्सव असतो. यंदा केवळ दहा दिवसच दीपोत्सव असेल. दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानाच्या सभोवती यंदाही मोठ्या संख्येने कंदिल, रोषणाई करण्यात येणार आहे.