मुंबई- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील कौटुंबिक न्यायालयात गुरूवारी दुपारी बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. आयपी ॲड्रेसच्या आधारे तज्ञांची तांत्रिक मदत घेऊन सदर व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील वांद्रे येथील वांद्रे – कुर्ला संकुलात कौटुंबिक न्यायालय आहे. गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. एस. व्ही. शेखर याच्या विरोधातील पोक्सो प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण चेन्नईबाहेर हलवावे, अशी मागणी या ई-मेलमध्ये करण्यात आली होती.

तपासणीअंती अफवा असल्याचे निष्पन्न

घटनेची माहिती मिळताच बीकेसी पोलीस आणि बॉम्ब शोध व नाश पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायालय आणि परिसरातील नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. न्यायालय परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, तपासात कोणतेही स्फोटकं अथवा संशयास्पद गोष्ट आढळली नाही.

आयपी ॲड्रेसद्वारे शोध सुरू

या धमकीचा ई – मेल कोणी पाठवला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून ई-मेल पाठवणाऱ्याचा आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

धमक्यांचे सत्र सुरूच

गेल्या काही दिवसांत मुंबईत शाळा, न्यायालये आणि रेल्वे स्थानकांसह अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांत पोलिस आणि बॉम्ब शोध व नाशक पथकाने तत्काळ कारवाई करून तपास केला, परंतु सर्व धमक्या अखेर खोट्या ठरल्या.

शाळेत बॉम्बची अफवा

विलेपार्ले (पूर्व) येथील एका शाळेला ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी आली होती. हा ई-मेल पाहताच शाळा प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. बीकेसी पोलिस आणि बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल झाले, विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि सखोल झडती घेण्यात आली. मात्र काहीही सापडले नाही, आणि धमकी खोटी ठरली.

न्यायालयात बॉम्बची अफवा

मुंबई उच्च न्यायालयाला अशाच स्वरूपाचा ई-मेल आला होता. ई-मेलमध्ये न्यायालयात स्फोटक ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील कामकाज काही काळासाठी थांबवून इमारत रिकामी करण्यात आली. बीडीडीएस आणि पोलिसांनी संपूर्ण इमारतीची तपासणी केली, परंतु काहीही आढळले नाही.

रेल्वे स्थानक उडविण्याची धमकी

याचदरम्यान दादर रेल्वे स्थानकावरही अशाच प्रकारे फोन करून बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. स्थानक तातडीने रिकामे करण्यात आले, लोकलच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आणि रेल्वे पोलिसांसह मुंबई पोलिसांनी परिसराची तपासणी केली. अखेरीस ही धमकीही खोटी निघाली.

३४ ठिकाणी मानवी बॉम्बची धमकी

काही दिवसांनंतर आणखी गंभीर दावा करणारा एक फोन मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर आला होता. कॉल करणाऱ्याने शहरात “३४ मानव बॉम्ब” घुसवण्यात आल्याचा आणि “४०० किलो आरडीएक्स ” वापरून स्फोट घडविण्याचा दावा केला. या संदेशानंतर मुंबईत तातडीने हाय अलर्ट घोषित करण्यात आला, सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढविण्यात आली. तपासानंतर ही धमकीदेखील खोटी असल्याचे स्पष्ट झाले.