मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्या सर्वांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ ही मिनी टॉय ट्रेन ऑगस्टमध्ये पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. मे २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती. दरम्यान, ही टॉय ट्रेन ऑगस्ट महिन्यात पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.

उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’ पर्यटकांचे आकर्षण होती. मुलांबरोबरच त्याचे पालकही ‘वनराणी’मधून उद्यानाची सफर करण्याची मजा लुटत होते. मात्र, २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली, अनेक रस्ते उखडले गेले. त्यावेळी वनराणीच्या २.३ किमी लांबीच्या वळणदार मार्गावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही प्रचंड नुकसान झाले होते.

वनराणीची धाव तेव्हापासून बंद झाली. वनराणी नव्याने सुरू करण्यासाठी २.३ किमीचा रेल्वे मार्ग पूर्णत: नव्याने बांधावा लागला. दरम्यान, गेल्या वर्षी वनराणीचे काम सुरू झाले होते. त्यामुळे तब्बल पाच वर्षांनी, ऑगस्ट २०२५ पर्यंत वनराणी पुन्हा नव्याने पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

विजेवर चालणारी गाडी

पूर्वी डिझेलवर चालणारी गाडी आता विजेवर धावणार आहे. त्यात चार डबे असतील. मार्गावरील स्थानकांचे, तसेच कृत्रिम बोगद्याचेही नूतणीकरण करण्यात आले आहे. तसेच रुळही नवीन बसविण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९७४ मध्ये सुरुवात

राष्ट्रीय उद्यानात १९७४ मध्ये वनराणी सुरू झाली. वनराणीच्या माध्यमातून उद्यानास दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये महसूल मिळत होता. आकर्षक, छोटेखानी इंजिन आणि त्यात जोडलेले चार खुले डबे अशी रचना असलेली वनराणी उद्यानाच्या झाडीतून धावताना जंगलाचे सौंदर्य न्याहाळता येत होते. एका वेळी गाडीच्या प्रत्येक डब्यात १६ प्रमाणे ६४ प्रवाशांना सैर करता येत होती. ही फेरी साधारण ३० मिनिटांची होती. आता नव्याने विजेवर धावणारी वनराणी सज्ज होत आहे.