मुंबई : मुंबईत सध्या पाऊस – उन्हाच्या सुरू असलेल्या खेळामुळे मागील काही दिवसांमध्ये डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या १५ दिवसांमध्ये हिवतापाचे ५७१ रुग्ण, तर डेंग्यूचे ४०५ रुग्ण सापडले आहेत. डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरणामुळे पुढील काही दिवसांमध्ये यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
साथीच्या आजारांच्या ‘तापा’ला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजनां करण्यात येत आहेत. या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने तापाने फणफणणारे रुग्ण अशक्तपणामुळे बेजार झाले आहेत.
पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. मात्र सप्टेंबरमध्ये या रुग्णांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात होते. परंतु मागील काही दिवसांमध्ये अधूनमधून पडणारा पाऊस, कडक उन यामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढ झाली आहे. त्यातच हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.
सप्टेंबरच्या १५ दिवसांमध्ये मुंबईमध्ये हिवतापाचे ५७१, तर डेंग्यूचे ४०५ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्येही तापाचे रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये ताप, अशक्तपणा, थकवा, थंडी वाजणे यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार करण्याबरोबरच त्यांची रक्त तपासणी करण्यात येत आहे. १० पैकी दोन – तीन रुग्णांना हिवताप किंवा डेंग्यू झाल्याचे आढळत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पावसाच्या लहरीपणामुळे साथीच्या आजारांचा ‘ताप’ वाढत असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
मुंबईमध्ये साथीच्या आजरांच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागल्याने मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार शहरातील ४ लाख ७४ हजार ४५० घरातील २२ लाख ७३ हजार ५२९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ८३ हजार २२८ नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हिवतापासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची २५ हजार ३६३ उत्पत्ती स्थाने आणि डेंग्यूच्या डासांची २६ हजार ९१३ उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शहरातील इमारती, झोपडपट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धूम्रफवारणी मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने १ सप्टेंबरपासून शहरातील १९ हजार ३५४ इमारती व ३ लाख १४ हजार ८३० झोपड्यांमध्ये धूम्रफवारणी केल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.