भाजपाकडून आंतरधर्मीय लग्नांकडे बोट करत वारंवार ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला जात आहे. सध्या हा विषय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पोहचला. मंत्री मंगलप्रभात लोढांनी राज्यात १ लाख लव्ह जिहादची प्रकरणं झाल्याचा दावा केल्यानंतर आता विधिमंडळाबाहेरच भाजपा आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना खुलं आव्हान दिलं.
नितेश राणे आणि अबु आझमींची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली. अबु आझमी म्हणाले, “मुस्लिमांना इथं राहून देणार नाही, मशीद बंद करू, मुस्लिमांशी व्यवहार बंद करा, त्यांना भाड्याने घर देऊ नका, अशी विधानं रोज होत आहेत.” यावर नितेश राणेंनी ‘ग्रीन झोन’मधील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. यावर आझमींनी जर चुकीचं घडत असेल, बेकायदेशीर असेल तर ते बांधकाम पाडून टाकावं अशी भूमिका घेतली.
व्हिडीओ पाहा :
“महानगरपालिकेने प्रत्येक समाजाची बेकायदेशीर बांधकामं पाडून टाकावीत. त्याला कुणीही नकार देत नाही,” असं मत अबु आझमींनी व्यक्त केलं. त्यावर नितेश राणेंनी बांधकाम तोडताना लोक हत्यारं घेऊन येतात, असा आरोप केला. त्यावर आझमींनी मुस्लिमांची संख्या ११ टक्के आहे. हत्यारं चालवण्याची त्यांची पात्रता नाही, असं प्रत्युत्तर दिलं. तसेच तुम्ही म्हणाल तेव्हा मी येईल आणि हे आरोप खोटे आहेत, असं खुलं आव्हान दिलं. तसेच राणेंनीही माझ्याबरोबर यावं, असं आव्हान दिलं.
हेही वाचा : कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा पुरेसा नाही; भाजपा नेत्यांना असे का वाटते?
नितेश राणे म्हणाले, “तुम्ही माझ्याबरोबर या. मी तुम्हाला लव्ह जिहादची प्रकरणं दाखवतो. त्यानंतर तुम्हाला लव्ह जिहाद आहे हे मान्य करावं लागेल. तुम्ही मला तारीख आणि वेळ सांगा. मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन घेऊन जाईल.” यावर आझमींनी लव्ह जिहाद असा कोणताही प्रकारच अस्तित्वात नसल्याचा दावा केला.