मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी-हिंदी चित्रपटांमधील चरित्र भूमिकांमधून दया डोंगरे यांनी प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण केली. एनएसडीतून प्रशिक्षण घेतलेल्या डोंगरे यांनी ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘लेकुरे उदंड झाली’सारख्या लोकप्रिय नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. पडद्यावर त्यांनी साकारलेली खाष्ट सासूची ठसकेबाज भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.
दया डोंगरे यांचा जन्म अमरावतीत झाला होता. काही काळ कर्नाटकमधील धारवाडमध्येही त्यांचे वास्तव्य होते. अभिनय आणि संगीत असा दोन्हींचा वारसा त्यांना आई अभिनेत्री यमुनाताई मोडक आणि आत्या गायिका-अभिनेत्री शांता मोडक यांच्याकडून मिळाला होता. अभिनयाआधी त्यांना संगीताविषयी अधिक आपुलकी होती. आकाशवाणी गायन स्पर्धेतही त्यांनी यश मिळवले होते. मात्र, अभिनयाची ओढ वाटू लागल्यानंतर त्यांनी दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
एकांकिका आणि विविध नाट्यस्पर्धा गाजवणाऱ्या दया डोंगरे यांनी सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांच्या ‘नाट्यद्वयी’ संस्थांच्या नाटकांमधून काम केले. ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘इडा पिडा टळो’ अशा विविध नाटकांमधून भूमिका करत अभिनयक्षेत्रातील घोडदौड सुरू ठेवली.
सोनेरी युगाचा साक्षीदार हरपल्याची भावना
सत्तर-ऐंशीच्या दशकात नाटक-चित्रपटक्षेत्रातील सोनेरी काळ आणि दूरदर्शनचा प्रभाव असलेल्या काळात प्रत्येक माध्यमाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर त्या यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या गेल्या आणि म्हणूनच त्या सोनेरी युगाचा साक्षीदार आज त्यांच्या निधनाने हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘करारीपणा’ भूमिकांचे वैशिष्ट्य
१) रत्नाकर मतकरी आणि दामू केंकरे दिग्दर्शित ‘बिऱ्हाड वाजलं’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकाच्या दुसऱ्या आवृत्तीत त्या अभिनेते श्रीकांत मोघे यांच्याबरोबर काम करू लागल्या. ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘संकेत मीलनाचा’, वसंत कानेटकर लिखित ‘माणसाला डंख मातीचा’, ‘माता द्रौपदी’ अशा नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिकांमधून एक सशक्त अभिनयगुण असलेली अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
२) व्यक्तिमत्त्वातील करारीपणा आणि नजरेतील जरब हे मालिका-चित्रपटातील त्यांच्या अनेक भूमिकांचे वैशिष्ट ठरले. त्यामुळेच ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ चित्रपटातील त्यांची खाष्ट सासूची काहीशी विनोदाकडे झुकणारी भूमिका लोकांना अधिक आवडली.
