लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

मुंबई: जागतिक किडनी दिनानिमित्त बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनने मुलांच्या किडनीच्या आरोग्याचे चांगले रहावे यासाठी महिनाभराची जागरूकता मोहीम सुरू केली. ‘तुमचे मूत्रपिंड ठिक आहे का’ ही यावर्षीची संकल्पना आहे. वेळीच निदानाने मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राखता येते याबाबत मुलांमध्ये जागरूकता पसरवून त्यांना प्रतिबंधात्मक उपचारांविषयी माहिती देणे गरजेचे आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, रुग्णालयाने बालरुग्णांसाठी एक विशेष प्राणीसंग्रहालयाला भेट आयोजित केली, ज्यामुळे त्यांना आनंदांचे काही क्षण अनुभवता आले. शिवाय, रुग्णालयाने डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण आणि दात्यांना एकत्र आणत किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती केली. यानिमित्ताने पोस्टर मेकींग स्पर्धा आयोजित करण्यात आली.

मुलांमध्ये क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) ही एक अशी स्थिती आहे जिथे मूत्रपिंड कालांतराने कार्य करणे बंद करते, ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थाचा निचरा न झाल्याने मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. या समस्येविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनने किडनीचे आरोग्य आणि वेळीच निदानाचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक, संवादात्मक आणि सामाजिक उपक्रमांसह महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेची योजना आखली आहे.

किडनीचे नुकसान होईपर्यंत मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. याबाबत आयोजित जनजागृती उपक्रमाची सुरुवात ही पोस्टर मेकींग स्पर्धेने झाली. १३ मार्च रोजी डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण, किडनी दाते आणि त्यांच्या कुटुंबियांना एकत्र आणून एक विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लहान वयात मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रासलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी भायखळा येथील राणीबाग प्राणीसंग्रहालयात सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या मुलांसाठी, किडनीच्या आजाराशी लढणे हा एक दैनंदिन संघर्ष आहे, ज्यामुळे अनेकदा वेदना सहन करणे तसेच सतत रुग्णालयात धाव घ्यावी लागते .

क्रॉनिक किडनी डिसीज ही एक जागतिक आरोग्य समस्या आहे, जी जगातील १० टक्के लोकसंख्येला प्रभावित करते. प्रौढांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि औषधांशी संबंधित नेफ्रोपॅथी सारख्या जीवनशैलीच्या विकारांमुळे सीकेडी होतो. वेळीच उपचार करणे गरजेचे आहे कारण २०४० पर्यंत, सीकेडी हे जागतिक स्तरावर मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण ठरेल असा अंदाज आहे. या मोहिमेद्वारे, मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका असलेल्या मुलांसाठी निरोगी भविष्य सुनिश्चित करून वेळीच निदान, प्रतिबंध आणि मूत्रपिंडाची योग्य काळजी घेण्यास मदत करण्याचे आमचे ध्येय आहे असे बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेचा एक भाग म्हणून, रुग्णालय रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिक्षित करण्यासाठी मूत्रपिंडाच्या आजाराच्या पथनाट्य सादर करत त्याविषयी जागरुकता निर्माण करत आहे.