लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिकेतर्फे गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड परिसरातील फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कारणास्तव २४ ते २५ मे दरम्यान २४ तासांसाठी घाटकोपर, भांडुप व मुलुंड भागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली असून दुरुस्तीसाठी शुक्रवार, २४ मे रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागातील पाणीपुरवठा पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

महानगरपालिकेतर्फे दोन ठिकाणी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम आज सकाळी ११.३० वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० या वेळेत करण्यात येणार आहे. मुलुंड (पश्चिम) येथील गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालगत हे काम केले जाणार आहे. या कालावधीत घाटकोपर, भांडुप व मुलुंड विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.

आणखी वाचा-मुंबई : खड्ड्याच्या सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून फिरा, पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश

रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या टेलपीस सॉकेट जॉइंटमधून २२ मे रोजी रात्री मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आढळले. जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत त्याची पाहणी केली. बुधवारी रात्री सुरू झालेली गळती महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर प्रयत्न करत थोपवून धरल्यामुळे गुरुवारी दुपारी व सायंकाळी तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा करण्यात आला. पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दुरूस्तीचे काम गुरूवारी रात्री सुरू करण्यात आले असून शुक्रवारी दुपारपर्यंत चालणार आहे. त्यामुळे शुक्रवारी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागात पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या वेळेत नियमित होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आणखी वाचा-माझगाव येथे अल्पवयीन मुलाकडून दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

या विभागात पाणीपुरवठा बंद राहणार

१) एन विभाग – विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय. ( मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – (२५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील)

२) एस विभाग – नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा संपूर्ण परिसर, टागोर नगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक १ ते ३२ व २०३ ते २१७ ( मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – (२५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील), मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशफोर्ड टॉवर, रुणवाल टॉवर, फोर्टिस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्ग लगतचा परिसर (सुभाषनगर, एम. एम. आर. डी. वसाहत), गाव रोड, दत्त मंदीर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर (पहाटे ५ ते सकाळी १०) – (२५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील)

३) टी विभाग – मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालविय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव – (२४ तास पाणीपुरवठा बंद)