मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या लोकल, रेल्वेगाड्या, प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये सातत्याने तिकीट तपासणी मोहीमा राबविण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने एप्रिल – ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांना पकडून १२१ कोटी रुपयांहून अधिक रुपये दंड वसूल केला. तर, वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांना पकडून २ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, राजकोट, भावनगर आणि अहमदाबाद या विभागातील पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी करण्यात आली. या तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट प्रवाशांना पकडून गेल्या वर्षीपेक्षा जास्त दंडवसुली करण्यात यश मिळविले. एप्रिल – ऑक्टोबर या कालावधीत १८.९० लाख विनाप्रवाशांना पकडून १२१.६७ कोटी रुपये दंड वसूल केला. गेल्यावर्षी याच कालावधीतील दंड वसुलीच्या तुलनेत तो ५१ टक्क्यांनी जास्त आहे. तसेच रेल्वे मंडळाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा १४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

ऑक्टोबर महिन्यातच ३.३९ लाख तिकीट नसलेल्या/अनियमित तिकीट असलेल्या प्रवाशांना शोधून २४.२० कोटी रुपये रक्कम वसूल करण्यात आली. त्यामध्ये आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणांचा समावेश आहे. मागील वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत तो १०० टक्के जास्त आहे. वातानुकूलित लोकलमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये लक्ष केंद्रीत केलेल्या मोहिमेनुसार, एप्रिल – ऑक्टोबर २०२५ दरम्यान जवळजवळ ६२ हजार अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला. दंडापोटी २.०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत वसूल केलेल्या दंडाच्या तुलनेत तो ७६ टक्के जास्त आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.