मुंबई : वरिष्ठ नागरिकांच्या व्हॉटस ॲप ग्रुपमधील चर्चेला गंभीर गुन्ह्याचे स्वरुप आले आहे. ग्रुपमध्ये बदनामी केल्यामुळे एका वृध्दाने ७५ वर्षांच्या महिलेला चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि तिच्याकडील साडेतील लाखांचे दागिने उकळले. मालाड पोलिसांनी या वृध्दाला अटक केली आहे.

समाजमाध्यमाच्या (सोशल मीडिया) वाढत्या वापरामुळे व्यक्त होण्याची संधी मिळत असली, तरी त्यातून वाद निर्माण होण्याच्या घटना वाढत आहेत. विशेषतः व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये मतभेद तीव्र रूप धारण करतात. एका ग्रुपमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक सहभागी असतात. त्यांच्यामध्ये अगदी किरकोळ विषयांवरूनही तीव्र मतभेद होतात.

लिखित संदेशांमध्ये आवाजाची लय किंवा भावना व्यक्त होत नसल्याने गैरसमज वाढतात आणि चर्चाच वादात रूपांतरित होते. मालाडमध्ये एका ७५ वर्षांच्या वृध्द महिलेला व्हॉटस ॲप ग्रुपमधील असाच एक वाद महागात पडला.

व्हॉटस ॲप ग्रुपवर बदनामी केल्याचा राग

तक्रारदार महिला ७५ वर्षांची असून विधवा आहे. ती मालाडच्या सुंदर नगर परिसरात एकटीच राहते. शिकवणी घेऊन ती आपला उदरनिर्वाह करते. तिची मुले वेगळी राहतात. ही महिला एका वरिष्ठ नागरिकांच्या व्हॉटस ॲप ग्रुपमध्ये सक्रिय आहे. हा ग्रुप वरिष्ठ नागरिकांच्या संगीताचे कार्यक्रम आयोजित करत असतो. काही दिवसांपूर्वी त्यांच्या व्हॉटस ॲप ग्रुपमध्ये वाद झाला होता. पण तो तात्पुरता होता आणि त्याच दिवशी शमला होता.

वृध्देच्या घरी चाकू घेऊन शिरला

या वृध्देने केलेली टिप्पणी एका ६० वर्षांच्या वृध्दाच्या चांगलीच जिव्हारी लागली. हा वृध्द महिलेच्या घरी गेला. यापूर्वी देखील तो महिलेच्या घरी गप्पा मारण्यासाठी येत होता. त्यामुळे वृध्देला काही शंका आली नाही. मात्र घरी येताच आरोपी वृध्दाने तिला व्हॉटस ॲप ग्रुपवर बदनामी का केली याचा जाब विचारला. काही वेळातच त्याने स्वत: जवळील चाकू काढला आणि महिलेला धमकावले. वृध्देकडे त्याने ५ लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा ठार मारण्याची धमकी दिली.

घाबरून वृध्देने आपल्याकडील साडेतीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले असावे असे तिला वाटले. तिने या आरोपी वृध्दाचे छायाचित्र इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला दिले आणि या व्यक्तीला पुन्हा इमारतीत प्रवेश न देण्याबाबत सांगितले.

आरोपी वृध्दाला अटक

या घटनेमुळे वृध्द महिला तणावात होती. काही दिवसांनी तिने हा प्रकार आपल्या मुलांना सांगितला. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. अखेर वृध्द महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे मालाड पोलिसांनी आरोपी वृध्दाविरोधात खंडणीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले. तपासानंतर या आरोपी वृध्दाला अटक करण्यात आली.