मुंबई : राज्याच्या बहुतेक भागात मे महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत. विभागीय आयुक्तांकडून पंचनाम्याच्या माहितीचे संकलन सुरू आहे. पंचनाम्याची माहिती अंतिम होताच महाडीबीटी योजनेद्वारे मदतीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राजेश राठोड, अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि वीज पडण्याच्या घटनांमुळे झालेल्या शेती पिकांच्या आणि जनजीवनाच्या नुकसानीबाबतच्या मदतीचे वाटप करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यात मार्च – एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप करण्यात येईल. राज्यात वीज पडून ६३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. ज्यांना अद्याप मदत मिळाली नाही, त्यांना दोन दिवसांत मदत दिली जाईल, असेही जाधव यांनी सांगितले.
यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात ७५,३५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, १,६८,७५० शेतकरी प्रभावित झाले आहेत. यासाठी सुमारे २१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित आहे. ओल्या दुष्काळाचे निकष वेगळे आहेत. सध्याचा पाऊस निकष पूर्ण करीत नाही. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही. सध्या राज्यात ८ जून २०२५ पर्यंतचे पंचनामे सुरू असून, त्यानंतर संबंधित मदतीचा निर्णय घेण्यात येईल. घरांच्या पडझडीच्या मदतीसाठी विभागवार निधी वितरित करण्यात आला असून, कोकण, नाशिक आणि अमरावती विभागांना प्रत्येकी पाच कोटी, पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागांना प्रत्येकी बारा कोटी, तर नागपूरला दहा कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.