मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर जुलै महिन्यापर्यंत मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झालेली किंवा वगळण्यात आलेल्या नावांची यादी अजूनही प्रसिद्ध झालेली नाही. मतदार याद्यांबाबत एवढी गुप्तता का, असा सवाल महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला. विरोधकांच्या तक्रारीनंतर दोन्ही निवडणूक विभागाने सर्व राजकीय पक्षांची उद्या बैठक आयोजित केली आहे.
मतदारयाद्यांबाबत निर्माण झालेला संशय दूर करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातही मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोळ होण्याची शक्यता लक्षात घेता महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी राज्याचे निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, शेकापचे जयंत पाटील आदींचा समावेश होता.
राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी झाली. त्याचप्रमाणे नावेही वगळण्यात आली होती. त्याचा तपशील सादर करण्यात आला नाही. विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर २०२४ मध्ये पार पडल्यावर जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणावर नावे समाविष्ट करण्यात आली वा वगळण्यात आली. वगळण्यात आलेली वा समाविष्ट करण्यात आलेली नावांची यादी प्रसिद्ध का केली जात नाही, असा मुख्य सवाल विरोधकांकडून करण्यात आला. ही यादी लपविण्यामागे काही राजकीय छुपा हेतू वा कोणाचा दबाव आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती विरोधकांकडून चोकलिंगम यांना करण्यात आली.
१ जुलै हा आधार मानून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानंतर १८ वर्षे पूर्ण होतील अशांचा मतदानाचा अधिकार का डावलला जात आहे, असा सवाल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. राज्यातील दुबार मतदारांची नोंदणी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाने काय प्रयत्न केले, याचीही विचारणा विरोधी नेत्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे व्हीव्हीपॅट वापरणे शक्य नाही, असा निवडणूक आयोगाचा दावा आहे. मग बहुसदस्यीय निवडणूक पद्धत रद्द करा किंवा अधिकचे व्हीव्हीपॅट मागवून लोकांच्या मनातील संभ्रम दूर करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. तेथेही व्हीव्हीपॅटचा पर्याय उपलब्ध करून देणार नसल्यास निवडणुका या मतपत्रिकांच्या माध्यमातून घेण्याची मागणी शिवसेनेने केली.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड. वर्षा गायकवाड आदींनी अनेक शंका उपस्थित केल्या. चोकलिंगम यांनी कोणत्याही प्रश्नावर काहीही मतप्रदर्शन करण्याचे टाळल्याचे उपस्थित नेत्यांकडून सांगण्यात आले.
राजकीय पक्षांशी चर्चा
महाविकास आघाडी तसेच मनसेने घेतलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधून संयुक्त बैठक घेण्याची सूचना केली. त्यानुसार उद्या सकाळी मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयुक्त संयुक्तपणे राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत.
‘मतदार याद्यांचा विषय कार्यकक्षेत नाही’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदारयाद्यांमध्ये नावे वगळण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा राज्य निवडणूक आयोगाला काहीही अधिकारी नाही वा त्यांच्या कार्यकक्षेत येत नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते याकडे वाघमारे यांनी लक्ष वेधले.