मुंबईः प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेला गुंतवणूकीवर दोन कोटी रुपये कमवण्याच्या आमीष दाखवून आरोपींनी तिची ६३ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मध्य सायबर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला असून रक्कम जमा झालेल्या बँक खात्याच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
प्रभादेवीतील रहिवासी असलेल्या ५६ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांना अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. त्यात, त्यांच्या कंपनीत ब्लॉकट्रेडींगमध्ये गुंतवणुक केल्यास १० ते २९ टक्के नफ्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. ग्रुपवरील नफ्याचे संदेश पाहून त्यांनीही गुंतवणूक करायचे ठरवले. त्यांचे खाते तयार करण्यात आले. त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात करताच खात्यातील रक्कम वाढताना दिसल्याने त्यांचा विश्वास बसला. पुढे, आयपीओ अलॉट झालेला असून ३१ लाख रुपये भरण्यास सांगितले. तसेच ही रक्कम न भरल्यास आधीची रक्कम देखील मिळणार नसल्याचे सांगितले.तक्रारदार महिलेने वारंवार दूरध्वनी करून रकमेबाबात विचारणा केली असता आरोपी महिलेने तिने दोन कोटी परत हवे असल्याने ९७ हजार रुपयांचे शुल्क भरावे लागले. त्यानुसार त्यांनी ही रक्कम भरली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व्यवहार थांबवले. तोपर्यंत ९ डिसेंबर ते १० जून दरम्यान त्यांनी ६३ लाख गुंतवले होते. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.
१२०० कोटींच्या सायबर फसवणूकीच्या तक्रारी
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये मुंबईतील सायबर फसवणूकीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुंबईत केवळ २६२ कोटी रुपयांची सायबर फसवणूकी झाल्या होत्या. २०२४ नोव्हेंबर त्यात वाढ होऊन ११८१ कोटी रुपये सायबर फसवणूक झाली आहे. २०२३ मध्ये याच कालावधीत या हेल्पलाईनला सुमारे ९१ हजार दूरध्वनी आले होते. त्यातही २०२४मध्ये वाढ झाली. २०२४ नोव्हेंबर महिन्यापर्यंत ५५ हजार ७०७ जणांनी सायबर फसवणूक झाल्याची तक्रार केली असून त्यात ११८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. त्यातील केवळ १२ टक्के म्हणजे १३९ कोटी १५ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १८ हजार २५६ जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची २६२ कोटी ५१ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. त्यातील केवळ १० टक्के म्हणजे २६ कोटी ५२ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे सायबर फसणकीतील रक्कम परत मिळण्याचे प्रमाणही फार कमी आहे.