मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्वसन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील सहा पुनर्वसित इमारतींच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आता दुसरीकडे पूर्वमूक्त मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामालाही शक्य तितक्या लवकरच सुरुवात करण्याच्यादृष्टीने रमाबाई नगर – कामराज नगर पुनर्विकासातील दुसऱ्या टप्प्यामधील झोपड्या हटविण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विस्तारीकरणात थेट बाधित होणाऱ्या १६९४ झोपड्या हटवून जागा रिकामी करून देण्याची मागणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे केली आहे. झोपु प्राधिकरणाने बाधित १६९४ झोपड्या हटविण्याच्या कामाला डिसेंबरपासून सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नवीन वर्षात विस्तारीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

घाटकोपर – ठाणे प्रवास अतिजलद, वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी एमएमआरडीएने १६.८ किमी लांबीचा चेंबूर – पी. डी’मेलो मार्ग दरम्यान पूर्व मुक्त मार्ग बांधला. आता या पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार घाटकोपर – ठाणे दरम्यान करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. घाटकोपर – ठाणे दरम्यान १२.९५५ किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग बांधण्यात येणार आहे. या ४० मीटर रुंदीच्या या पूर्व मुक्त मार्गासाठी अंदाजे २६६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून प्रकल्पाचे कंत्राट मे. नवयुग इंजिनीअरिंगला मिळाले आहे. पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात घाटकोपरमधील रमाबाई नगरमधील १६९४ झोपड्या बाधित होणार आहे. या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संपूर्ण रमाबाई नगरसह शेजारच्या कामराज नगरचे पुनर्वसन ४० वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या संयुक्ती भागिदारी योजनेअंतर्गत झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीएने संपूर्ण रमाबाई नगर आणि कामराज नगरचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. येथील १७ हजार झोपड्यांचे पुनर्वसन आता सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी पुनर्वसन प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आता पहिल्या टप्प्यातील सहा पुनर्वसित इमारतींच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात चार हजारांहून अधिक झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र महत्त्वाच्या अशा पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरणाचे काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे आता एमएमआरडीएने पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरणाच्या कामालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाकडे दुसऱ्या टप्प्यातील १६९४ झोपड्या लवकरात लवकर हटवून जागा रिकामी करून ती ताब्यात देण्याची मागणी केल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

एमएमआरडीएच्या मागणीनुसार डिसेंबरपासून दुसऱ्या टप्प्यातील एन-२१ येथील १६९४ झोपड्या हटविण्यास सुरुवात होईल. या झोपड्यांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली असून एमएमआरडीएने या झोपडीधारकांना द्यावयाची दोन वर्षांच्या घरभाड्याची रक्कमही झोपु प्राधिकरणाकडे वर्ग केली आहे. त्यामुळे आता रहिवाशांबरोबर करार करून डिसेंबरपासून झोपड्या रिकाम्या करण्यास सुरुवात केली जाईल. त्यानंतर जागा रिकामी करून एमएमआरडीएकडे हस्तांतरित केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही महिन्यातच जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येणार असून पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरणाच्या कामाला २०२६ मध्ये सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. तर कामास सुरुवात झाल्यापासून किमान चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या चार-पाच वर्षानंतर ठाणे – घाटकोपर प्रवास अतिजलद होणार आहे.