मुंबई: वाढत्या शहरीकरणामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली. वाढते प्रदुषण, बदलते हवामान हे बालदम्यास कारणीभूत ठरत आहे. ६ ते १० वयोगटातील मुलांमध्ये ही समस्या वेगाने वाढत असून पालकांनी आणि शाळांनी वेळीच लक्षणे ओळखून प्रभावित मुलांना सुरक्षित राखण्यासाठी योग्य तो प्रयत्न केला पाहिजे. अचुक उपचार, जीवनशैलीतील बदलांद्वारे बालदम्याचे व्यवस्थापन करता येते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दम्याचा फुफ्फुसांवर आणि श्वसनमार्गांवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. मुलांमध्ये, हे बहुतेकदा सततच्या खोकल्यामुळे दिसून येते, विशेषतः रात्रीच्या वेळी छातीत घरघर, श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत जडपणा येणे अशी लक्षणे आढळून येतात. दमा हा हवामानातील बदल, श्वसन संसर्गांमुळे होऊ शकतो, परंतु वायू प्रदूषणासारखे पर्यावरणीय घटक देखील यास तितकेच कारणीभूत ठरत आहेत.

बालदमा हा एक असा आजार आहे, ज्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे, दम्याचा कौटुंबिक इतिहास, अॅलर्जी, त्वचारोगाची लक्षणे, श्वासनलिकेसंबंधीत समस्या जसे की छातीत घरघर, खोकला असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. वायू प्रदूषण, वाहनातून बाहेर पडणारा रासायनिक धूर आणि औद्योगिक प्रदुषण हे मुलांच्या श्वसनमार्गात अडथळा निर्माण करु शकतात तसेच त्यांच्या श्वसनमार्गास सूज येऊ शकते, ज्यामुळे दम्याची लक्षणे वाढू शकतात.

लहान मुलांचे फुफ्फुसं पूर्णतः अजूनही विकसित झालेली नसतात त्यामुळे त्यांना याचा अधिक धोका असतो. प्रदूषणाची उच्च पातळी असलेल्या शहरी भागात राहणाऱ्या शाळकरी मुलांमध्ये बालदम्याची समस्या वाढताना दिसून येते.लीलावती रूग्णालयातील फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ. आभा महाशूर यांनी सांगितले. प्रदूषकांमुळे नाजूक वायुमार्गास सूज येते, ज्यामुळे मुलांना श्वास घेणे कठीण होते.

एका महिन्यात उपचाराकरिता येणाऱ्या ६ ते १० वयोगटातील तीन ते चार मुलांना वारंवार खोकला येणे, खेळताना दम लागणे, छातीत घरघर झाल्यामुळे झोपेच्या समस्या उद्भवणे आणि छातीत जडपणा जाणवणे यासारखी लक्षणे नोंदवली आहे. या मुलांना वेळीच उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला असून यापैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही.

वायू प्रदूषण देखील दम्यास कारणीभूत ठरू शकते. आमच्याकडे उपचारासाठी आलेल्या तसेच या आजाराचा वैद्यकिय, आनुवंशिक इतिहास नसलेल्या ६ ते १० वयोगटातील किमान दोन मुलांमध्ये दम्याचे निदान केले जाते. अशा मुलांना सतत खोकला, छातीत घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार सतावत आहेत. सुदैवाने या मुलांना अद्याप रुग्णालयात दाखल करावे लागलेले नाही. प्रदूषित हवेच्या सतत संपर्कामुळे फुफ्फुसांना सूज येणे आल्याची लक्षणे या मुलांमध्ये आढळून आली आहेत. मात्र योग्य औषधोपचाराने तसेच आवश्यक ती काळजी घेतल्याने आजार नियंत्रणात आणता येतो असे झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. तन्वी भट्ट यांनी सांगितले.

सध्या, मुलांमध्ये दम्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बालरोग दम्याचे वेळीच व्यवस्थापन करण्यासाठी त्याचे वेळीच निदान करणे गरजेचे आहे. सतत लक्षणे आढळणाऱ्या मुलांसाठी स्पायरोमेट्री सारखी फुफ्फुसांची कार्य चाचणी. लक्षणांचे मूल्यांकन केल्यानंतर दम्याचे निदान करण्यासाठी ऍलर्जी चाचणी केली जाऊ शकते. दम्याचे वेळीच निदान केल्यास आपल्याला योग्य उपचार करता येतात आणि दीर्घकालीन फुफ्फुसांचे नुकसान टाळता येते. पालकांनी आपल्या मुलांमधील श्वसनासंबंधीत लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत वैदयकिय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे ठाण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ संदीप केळकर यांनी सांगितले.

वारंवार खोकला, छातीतील घरघर किंवा दम लागणे अशा लक्षणांकडे पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे, विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा खेळल्यानंतर ही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. घरातील हवा स्वच्छ आणि खेळती राहिल याचा प्रयत्न करा, एअर प्युरिफायर वापरा, घरात धूम्रपान करणे टाळा आणि प्रदूषण जास्त असताना मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका. प्रदूषणाची पातळी जास्त असल्यास मुलांना मास्कचा वापर करण्यास लावा व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करा, असे हितवर्धक मंडळ रुग्णालय कांदिवली येथील डॉ नीता सिंगी यांनी सांगितले.