मुंबई : सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटांप्रमाणे मद्याच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या धोक्याचा इशारा देणारी चिठ्ठी लावण्याचे आदेश देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. न्यायालयाने गुरुवारी या याचिकेची दखल घेऊन त्यावर केंद्र आणि राज्य सरकारसह केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

पुणेस्थित २४ वर्षांच्या यश चिलवार या तरूणाने ही जनहित याचिका केली असून मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका गुरूवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी. न्यायालयाने याचिकेतील सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून याचिकाकर्त्यांच्या मागणीवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

मद्याच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या इशाऱ्याचा उल्लेख टाळला जात असल्याने मद्याप्राशनाचा धोका, आरोग्याबाबतची जोखीम आणि हानिकारक घटक वाढत आहेत, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. एखादा ग्राहक उत्पादन खरेदी करतो तेव्हा त्यात वापरण्यात आलेली सामग्री आणि माहिती त्यांच्या मूळ आणि संपूर्ण स्वरूपात जाणून घेणे हा त्याचा/अधिकार असल्याचेही याचिकाकर्त्याने याचिकेत अधोरेखीत केले आहे. तसेच, कर्करोगाच्या इशाऱ्यांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी नियम तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे.

याचिकेत घटनेच्या अनुच्छेद ४७चा देखील उल्लेख करण्यात आला असून त्यानुसार, आरोग्यासाठी हानिकारक असलेली मादक पेये आणि औषधांवर बंदी आणण्याचा सरकारला अधिकार असल्याचे म्हटले आहे, या पार्श्वभूमीवर, मद्यामुळे आरोग्यास असलेल्या या धोक्याची दखल घेऊन मद्याच्या बाटल्यांवरील कर्करोगाच्या इशारे देणारे लेबल लावणे ही काळाची गरज बनली आहे. मद्याच्या बाटल्यांवर कर्करोगाचा धोका सांगणारे लेबल लावव्यामुळे नागरिकांत जागरूकता निर्माण होऊन मद्यप्राशनात लक्षणीय घट होण्याची शक्यता याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागणीचा आधार

याचिकाकर्त्याने मागणीचे समर्थन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन आरोग्य संघटनेच्या २५ जून २०२४च्या अहवालाचाही याचिकेत संदर्भ दिला आहे. त्यात, मद्यप्राशनामुळे ३० लाखांहून अधिक मृत्यूंची नोंद झाल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप आवश्यक असल्याचे अधोरेखीत करण्यात आले होते. याशिवाय, जागितक आरोग्य संघटनेने मद्याला वर्ग १ कर्करोगकारक म्हणून घोषित केले आहे, असे असतानाही मद्याच्या बाटल्यांवर ही महत्त्वाची वस्तुस्थिती नमूद करण्यात येत नाही, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. दुसरीकडे, आयर्लंड आणि दक्षिण कोरियाने कोणत्याही प्रकारच्या मद्यसेवनाला कर्करोगाशी जोडणारे इशारे आधीच अनिवार्य केले असल्याकडेही याचिकाकर्त्याने लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी मद्य हे किमान सात प्रकारच्या कर्करोगांचे मूळ असल्याचे आणि याचा विचार करता कर्करोगाची जोखीम दर्शवणारे लेबल मद्याच्या बाटल्यांवर लावणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.