Mental Health Crisis / मुंबई : बोरिवली येथे २७ वर्षीय तरुणीने राहत्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पर्ल बागुल असे या तरुणीचे नाव आहे.

पर्ल ही बोरिवली पश्चिमेच्या तन्वी गार्डन सोसायटीत आपल्या पालकांसह राहत होती. एमएचबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास पर्लने इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारली. जखमी अवस्थेत तिला कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघोले करीत आहेत.

नैराश्यामुळे केली आत्महत्या

पर्ल ही आयुष्यात अपयशी ठरत असल्याने नैराश्यग्रस्त होती. याच कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचा जबाब पर्लचे वडील मिलिंद जयराम बागुल (६३) यांनी पोलिसांना दिला. या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे आणि कोणतीही तक्रार नसल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. एमएचबी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.

क्षुल्लक कारणांमुळे तरुणांच्या आत्महत्या

अपयश, प्रेमभंग, ताण तणाव यासह अगदी क्षुल्लक कारणामुळे आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. अगदी मोबाईल दिला नाही, आई ओरडली तरी मुले आत्महत्या करत आहेत. यामध्ये किशोरवयीन मुले आणि तरुणांचे प्रमाण जास्त आहे.

उंच इमारतींवरून उडी मारून आत्महत्यांचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसांपासून उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या कऱण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्या ही बहुतेक वेळा ही तात्काळ होणारी कृती असते. अनेकदा आत्महत्या करणारी व्यक्ती काही मिनिटांपूर्वी पर्याय शोधत असते. त्या क्षणी समोर दिसणारी गच्ची, टेरेस किंवा गॅलरी आदी सोपे मार्ग वाटतात, असे मानसोपचारतज्ञ सांगतात.

उंच इमारतीवरून उडी मारल्यानंतर वाचण्याची शक्यता कमी असते त्यामुळेच मुंबईत ४५, ५७, २० अशा मजल्यांवरून उडी मारून आत्महत्यांच्या घटना घडत आहेत उंच इमारती म्हणजे सहज उपलब्ध, खात्रीशीर आणि वेदनारहित वाटणारा मार्ग असतो. जेव्हा व्यक्तीवर भावनिक, सामाजिक वा मानसिक ताण असतो आणि तेव्हा असे मार्ग सहज दृष्टीस पडतात.

उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या यापूर्वीच्या काही घटना –

  • २ जुलै २०२५
    कांदिवली – शिकविणीला जाण्यास सांगितल्याने १४ वर्षीय मुलाने ५७ मजली इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली.
  • ३ जुलै २०२५
    गोरेगाव येथे राहणाऱ्या २२ वर्षीय अनंत द्विवेदी या तरुणाने राहत्या इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
  • २५ जून २०२५
    भांडुप येथे ३१ व्या मजल्यावरून उडी मारून १५ वर्षीय मुलीची आत्महत्या.
  • १९ जून २०२५
    साठ्ये महाविद्यालयाच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून १९ वर्षीय संध्या पाठक या तरुणीची आत्महत्या. एकतर्फी प्रेमातून उचलले टोकाचे पाऊल.
  • २९ जून २०२५
    कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये एका 14 वर्षांच्या मुलीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या.
  • २७ मे २०२५
    विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे २३ व्या मजल्यावरून उडी मारून हर्षदा तांदोलकर (२५) या तरुणीची आत्महत्या.
  • २८ मे २०२५
    गोरेगाव येथे ४५ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीने आत्महत्या केली.
  • ७ मे २०२५
    दहिसर येथे राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून मर्मिन मेनन (७२) ७२ वर्षीय वृध्द महिलेने आत्महत्या केली आहे. आजारपण आणि नैराश्यामुळे मेनन यांनी आत्महत्या केल्याची शक्यता.
  • २ एप्रिल २०२५
    दादरच्या हिंदू कॉलनी येथील टेक्नो हाईटस या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून झाना सेठिया (२०) या तरुणीची आत्महत्या.