मुख्यमंत्री, अर्थ व ऊर्जामंत्री विदर्भातील तरीही अन्याय कायम

पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे काटोलचे युवा आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी विदर्भाच्या नावाने स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांसह अर्थ आणि ऊर्जामंत्री विदर्भाचे असूनही विदर्भाला न्याय मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे देशमुख यांची वाटचाल नाना पटोलेंच्या वाटेवर सुरू असल्याचे स्पष्ट होते.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतक ऱ्यांच्या प्रश्नांना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने न्याय दिला नाही, तर पक्षाचा राजीनामा देण्यास मागेपुढे पाहणार नाही. वेळप्रसंगी स्वतंत्र विदर्भाच्या नावाने आघाडी स्थापन केली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन देशमुख यांनी काटोल येथील नगरभवनमध्ये आयोजित कार्यक्रमात केले. यापूर्वी अशाच प्रकारच्या नरखेड येथील कार्यक्रमात देशमुख यांनी ‘होय मी बंडखोर’ असे म्हणत थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले होते हे येथे उल्लेखनीय.

स्वतंत्र विदर्भ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यानंतरही त्यांनी वेळोवेळी पक्षाच्या धोरणावेगळी भूमिका घेत आपण नाराज असल्याचे दर्शवले होते. काटोल येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी याची री ओढली. ते म्हणाले की, शेतमालाला भाव मिळायला हवा, त्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भाची दुर्दशा केली. विदर्भात निर्माण होणारी वीज मुंबई, पुणे, कोकणात जाते, मात्र विदर्भात शेतक ऱ्यांना पुरेशी वीज मिळत नाही. परिणामी पिकाचे नुकसान होऊन शेतकरी आत्महत्या करीत आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असल्यामुळे त्यांच्याकडून विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र शेतक ऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. विदर्भातील युवकांच्या हाताला काम नाही, कारण या भागात उद्योगधंदे नाहीत. नैराश्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी समृद्ध होणार नाही. पक्षापेक्षा शेतक ऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या हितासाठी केव्हाही राजानामा देण्यास तयार आहे. वेळ पडली तर वेगळ्या विदर्भाच्या नावाने स्वतंत्र आघाडीची स्थापना करून शेतक ऱ्यांसाठी लढा देईल, असा इशारा देशमुख यांनी दिला.