27 May 2020

News Flash

टाळेबंदीने शहरांमधील प्रदूषणात घट  

सर्व कारखाने, बांधकाम आणि परिणामी वाहतूक देखील बंद आहे

संग्रहित छायाचित्र

राखी चव्हाण

गेल्या दोन दशकातील सर्वाधिक कमी वायुप्रदूषणाचा स्तर देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पाहायला मिळाला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या माहितीनुसार टाळेबंदीनंतर १०३ शहरांपैकी ९० पेक्षा अधिक शहरांमध्ये वायुप्रदूषणात घट आढळून आली आहे. करोनामुळे जगभरात सक्तीचा बंद करण्यात आल्याने  सर्व कारखाने, बांधकाम आणि परिणामी वाहतूक देखील बंद आहे. त्यामुळे देशाच्या प्रमुख शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. देशातील प्रदूषणाचा स्तर इतका कमी कधीच आलेला नव्हता. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यावर असल्याने हवेच्या गुणवत्तेत गेल्या काही दिवसात मोठी सुधारणा जाणवत आहे. रविवारी, २२ मार्चला जनता संचारबंदीच्या दिवशी विविध शहरांमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड, पीएम १० आणि पीएम २.५ या प्रदूषकांमध्ये २० ते ५० टक्क्यांची घट आढळून आली. पीएम १० साठी वाहनांचे प्रदूषण हा घटक अधिक कारणीभूत ठरतो. त्यामुळे वाहतूकीवर निर्बंध आले की वाहनातील इंधनामुळै होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण येईल. सरकारचीच एक यंत्रणा असणाऱ्या ‘सफर’ या संस्थेने ही निरीक्षण नोंदवली आहेत. जोपर्यंत टाळेबंदी लागू आहे तोपर्यंत वातावरणातील ही तीनही प्रदूषके  कमी होतील, असेही या संस्थेने सांगितले आहे.

श्वसनप्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण देशभरातील अनेक शहरांमध्ये कमी झाले आहे. मुंबई शहरात ते ३८ टक्के , पुण्यात ते ४३ टक्के , तर नागपुरातही जवळजवळ ७० टक्क्यांवर आले आहे.

टाळेबंदी आधी व नंतरची नायट्रोजन ऑक्साईडची स्थिती

शहर – आधी – नंतर

दिल्ली – १६३ – ४७

पुणे – १०३ – ६५

मुंबई – १३० – ७०

कोलकाता -१४० – ९५

बंगळुरू – ७२ -७०

चेन्नई – ६९ – ५७

कानपूर – १२८ – १००

वायुप्रदूषणाच्या वाढीत वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मोठा वाटा आहे. शहरात एका विशिष्ट ठिकाणी वाहने थांबली की वाहनांमधून निघणाऱ्या विषारी प्रदूषकामुळे हवा प्रदूषित होते. वाहनांची गर्दी, बांधकाम, रस्त्यांची कामे, उद्योग यामुळे हवेतील पर्टीक्युलेट मॅटरचे प्रमाण आणखी वाढते. सध्या या सर्व क्रि या थांबल्यामुळे वायू प्रदूषणात घट झाली आहे. उपराजधानीतील हवेची गुणवत्तादेखील १५०-१६० वरुन ५०-७० पर्यंत आली आहे.

– -कौस्तुभ चटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ व संस्थापक ग्रीन व्हिजिल फाउंडेशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 12:29 am

Web Title: decrease in pollution in cities with lockout abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘करोना’विषयक सत्य माहितीसाठी वृत्तपत्रेच विश्वसनीय माध्यम
2 पशुखाद्याचे भाव वाढले, दुधाचे घटले
3 एकाच व्हेंटिलेटरवर आठ रुग्णांची व्यवस्था
Just Now!
X