हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर भादंविच्या कलम ३१२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवकुमारने दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासामुळेच दीपालीचा गर्भपात झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दीपालीने २५ मार्चला हरिसाल येथे सरकारी निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दीपालीने मेळघाटचे निलंबित क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली. यात तिने शिवकुमारच्या वर्तनाबाबत आणि त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाविषयीची माहिती दिली. वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून सहकार्य मिळाले नसल्याचेही तिने त्यात नमूद केले होते.
ऑक्टोबर २०२० मध्ये गर्भवती असल्यामुळे आपण श्रीनिवास रेड्डी दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत भ्रमंती करू शकत नाही, असे वरिष्ठ अधिकारी पीयूषा जगताप यांना सांगितले होते. मात्र त्यानंतर तब्बल तीन दिवस विनोद शिवकुमार तसेच साहाय्यक वनसंरक्षक यांनी कच्च्या रस्त्यातून फिरवले. त्यामुळे गर्भपात झाला, पण तरीही रजा दिली नाही, असे दीपालीने पत्रात लिहिले होते. या पत्राच्या आधारे आत्महत्या प्रकरणात शिवकुमारविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह््याचा तपास अमरावती जिल्ह््याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (ग्रामीण) पूनम पाटील करीत आहेत. दीपालीच्या औषधोपचाराची कागदपत्रे गोळा करून साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला. तपासादरम्यान नोंदवलेले जबाब, वैद्यकीय कागदपत्रांच्या बळावर आरोपी विनोद शिवकुमार याने दिलेल्या त्रासामुळेच दीपालीचा गर्भपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.