’ भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांचे हाल ’ बसायला जागा नाही, दोन तासांची प्रतीक्षा

नागपूर : खाजगी रुग्णालयात सुरू केलेले लसीकरण बंद करुन महापालिकेने  विविध भागातील केंद्रावर निशुल्क लस देणे सुरू केले. परंतु, या  केंद्रांवर  पुरेशी व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना  त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील दहाही झोनमध्ये कुठे शाळेमध्ये , मंदिरात तर कुठे समाजभवनात करोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीची दुसरी मात्रा मिळावी यासाठी प्रशासनाकडून शहरातील ९६ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र  ४० पेक्षा अधिक केंद्रांवर पुरेशी व्यवस्था नाही.   काही केंद्रावर परिचारिका आहे तर डॉक्टर नाही. नोंदणी करण्यासाठी कर्मचारी आहे मात्र नोंदणी करत टोकन दिल्यानंतर एक ते दीड तास ज्येष्ठांना प्रतीक्षा करावी लागत आहे.  पूर्व आणि मध्य नागपुरातील अनेक लसीकरण केंद्रावर फेरफटका मारला असताना कुठे विश्रांतीसाठी व्यवस्था नाही तर कुठे ज्येष्ठ नागरिकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे समोर आले. महापौरांचा प्रभाग असलेल्या बजेरिया भागातील सरस्वती तिवारी हिंदी प्राथमिक शाळेतील केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही.  विश्रांतीची खोली कुठे आहे याची तेथील नागरिकांना माहिती नाही. नंदनवन परिसरातील लक्ष्मीनारायण केंद्रावरील लसीकरण केंद्राच्या   बाहेर मंडप नाही.  बाहेरच्या भागात विश्रांती खोली आहे, पण ती बंद आहे. गणेशपेठ परिसरात साखळे गुरुजी शाळा गणेशपेठ, राहुल संकुल समाज भवन, दुर्गा नगर शाळा,मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरा गांधी समाजभवन, बीडीपेठ, नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, ताजबाग हेल्थ पोस्ट, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र,  कुंदनलाल गुप्ता नगर महापालिका शाळेतील केंद्रांवरही  पुरेशी व्यवस्था नसल्याचे दिसून आले.

काय म्हणतात ज्येष्ठ नागरिक?

महापालिकेने लसीची नि:शुल्क व्यवस्था केली असली तरी केंद्रावर विश्रांती आणि नोंदणीसाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र या शाळेच्या परिसरात  जागा नाही. लस घेतल्यानंतर थांबण्यासाठी व्यवस्था नसल्याने आता मुलासोबत घरी जात आहे.

बाबासाहेब बारलिंगे,  भालदारपुरा.

मानेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  बसायला जागा नाही. लस घेतली आणि डॉक्टरांनी अर्धा तास थांबायला सांगितले म्हणून खूर्चीवर बसली आहे. विश्रांतीसाठी जागा कुठे आहे माहीत नाही.

इंदिरा राऊत, मानेवाडा.

महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर  व्यवस्था नाही. नोंदणी आणि त्यानंतर लस घेण्यासाठी व  आराम करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी पण ती अनेक केंद्रावर दिसत नाही. ज्या ठिकाणी लस दिली जाते त्या ठिकाणी ४ ते ८ डिग्री तापमान असणे आवश्यक आहे तेही दिसत नाही. विश्रांती कक्ष शोधावा लागतो. उन्हाचा तडाखा असतानाही  मंडप नाही.  महापालिकेवरील कामाचा ताण बघता  आता खाजगी रुग्णालयांना मंजुरी देत लसीकरण सुरू केले पाहिजे.

डॉ. प्रभाकर देशपांडे