News Flash

बनावट ‘युजर आयडी’द्वारे रेल्वे ई-तिकीट विक्री

आरपीएफने नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा येथे केलेल्या कारवाईत एकेका एजन्टकडे २०० ते ३०० बनावट आयडी असल्याचे आढळून आले.

(संग्रहित छायाचित्र)

राजेश्वर ठाकरे

पारदर्शकतेचा दावा फोल; वर्षभरात १८ ठिकाणी छापे

रेल्वेच्या ई-तिकीट विक्रीचा परवाना मिळवायचा आणि नंतर याच परवान्याची ढाल करून शेकडो बनावट ‘युजर आयडी’ तयार करून तिकीट विक्री करण्याचे प्रकार राज्यात उघडकीस आले आहेत. गेल्या वर्षभरात नागपूर आणि आसपासच्या शहरात सुमारे १८ ठिकाणी छापे घालण्यात आल्या आणि तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे ऑनलाइन तिकीट विक्रीत पारदर्शकता असल्याचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे.

मध्य रेल्वेच्या नागपुरातील रेल्वे सुरक्षा दलाने अशा प्रकारे बनावट आयडीच्या माध्यमातून तिकिटांचा काळाबाजर होत असल्याचे सर्वप्रथम समोर आणले. त्यानंतर ही माहिती रेल्वे मंडळ आणि इतर ठिकाणच्या आरपीएफला कळवण्यात आली. त्यामुळे आता देशभर अशा प्रकारची कारवाई होत आहे.

एका विशिष्ट प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तिकीट खरेदी करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती आधीच भरून ठेवायची आणि तिकीट विक्रीसाठी संकेतस्थळ खुले होताच तिकीट खरेदी करायची, अशी कार्यपद्धती अवलंबण्यात आली. त्यासाठी एकच व्यक्ती वेगवेगळ्या नावाने बनावट युजर आयडी करतो. त्यामुळे प्रामाणिकपणे ऑनलाइन तिकीट खरेदी करणाऱ्याला कन्फर्म तिकीट मिळत नाही. मग प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन तिकीट घ्यावी लागते. मात्र, बनावट आयडीद्वारे तिकीट बुक करून एजन्ट लोक एका तिकिटावर ५०० ते १००० रुपये कमावत आहेत.

आरपीएफने नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा येथे केलेल्या कारवाईत एकेका एजन्टकडे २०० ते ३०० बनावट आयडी असल्याचे आढळून आले. तसेच लाखो रुपयांच्या शेकडो तिकिटे जप्त केली आहेत.

वर्षभरात १८ ठिकाणी धाड घालण्यात आल्या, त्यापैकी बहुतांश ठिकाणी आयआरसीटीचे अधिकृत एजन्ट अशा प्रकारचे काम करीत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनचा (आयआरसीटीसी) ई-तिकीट विक्रीचा परवाना होता. आयआरसीटीसीचे एजन्ट म्हणून मिळालेल्या आयडीद्वारे विशिष्ट कालावधी काही मोजक्या तिकीट बुक केल्या जाऊ शकतात. त्यामुळे बनावट आयडी करून आणि कमी वेळात अधिकाधिक तिकीट बुक करता यावे म्हणून सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. हे एजन्ट अधिकृत असल्याने तिकीट विक्री केंद्र उघडतात. लोक त्यांच्याकडे तिकीटसाठी जातात. तिकीट हवे असलेल्यांची माहिती एक दिवसआधी गोळा करतात आणि दुसऱ्या दिवशी संकेतस्थळ सुरू होताच त्यांच्या नावाने परंतु बनावट युजर आयडीचा वापर करून तिकीट बुक करतात. या संदर्भात रेल्वे बोर्डाला कळवण्यात आले आहे. बनावट आयडीने खरेदी केलेले तिकीट अवैध ठरते. त्यामुळे सापडलेल्या सर्व तिकीट रद्द करण्यात आल्या आहेत. तिकीट तपासनीसाने युजर आयडी तपासल्याने अनेकांना प्रवासादरम्यान दंड भरावे लागले, अशी स्थिती आहे.  रेल्वेने प्रकरणे हाताळण्यासाठी सायबर सेल तयार करावे, अशी सूचना रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी सांगितले.

वैयक्तिक आणि एजन्टचा आयडी

आयआरटीसीने नेमलेल्या एजन्टकडून ई-तिकीट खरेदी केल्यास त्यावर एजन्टचे नाव आणि त्यांचे कमिशन याची माहिती नमूद केली असते, परंतु वैयक्तिक आयडीने किंवा बनावट आयडीने ई-तिकीट काढल्यास त्यावर ही माहिती नमूद नसते. मात्र, त्यावर वैयक्तिक आयडीने हे तिकीट काढण्यात आले असून ती तिकीट एजन्ट विकू करू शकत नाही, असे लिहिलेले असते. वैयक्तिक आयडीने काढलेल्या तिकिटांवर एजन्ट कमिशन घेऊ शकत नाही. शिवाय बनावट आयडीद्वारे खरेदी बुक केलेली तिकीट अवैध ठरते.

कार्यपद्धती

रेल्वे तिकीट ऑनलाइन खरेदी करण्यासाठी नाव, वय, पत्ता आणि इतर माहिती भरावी लागते. त्यात वेळ जातो. त्यावर उपाय म्हणून काळा बाजार करणाऱ्यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ते बनावट ‘युजर आयडी’ तयार करतात आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने सर्व माहिती आधीच भरून ठेवतात. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ तिकीट विक्रीसाठी खुले होताच आधीच भरून ठेवलेल्या माहितीच्या आधारे तिकीट खरेदी केली जाते. त्यामुळे ‘कन्फर्म’ तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 2:59 am

Web Title: e ticket sales via fake user id
Next Stories
1 पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
2 लोकजागर : उमद्या व खुज्या रेषांची स्पर्धा
3 सुपारी व्यापाऱ्यांचे ३०० लॉकर सील!
Just Now!
X