News Flash

राज्यकर्त्यांकडून भांडेवाडीवासीयांचा अपेक्षाभंग!

एकीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागपूरकरांचे जीवनमान उंचावण्याची कल्पना मांडली जाते.

घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राच्या प्रवेशद्वारावरील कचऱ्याचा ढीग.  

 

भांडेवाडी कचराघर हटाव.. अशी घोषणा देत आंदोलन, मोर्च काढणारे सत्तेत आल्यावर भांडेवाडी परिसराचे चित्र पालटेल, असे येथील लोक आस लावून बसले होते, परंतु तीन वर्षे निघून गेली तरी त्यात बदल झालेला नाही. सुमारे २५ हजार लोकांचा जगण्याचा प्रश्न असून त्यांची सोडवणूक करण्यात राज्यकर्त्यांना अपयश आले आहे.

एकीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागपूरकरांचे जीवनमान उंचावण्याची कल्पना मांडली जाते, परंतु अनेक वर्षांपासून हजारो लोकांच्या आरोग्याशी निगडित असलेला भांडेवाडीचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष केले जाते, असे सध्याचे चित्र आहे.

शासन आणि प्रशासनाकडे भांडेवाडी कचराघर हटवण्याची योजना आहे, परंतु त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही. येथून कचराघर हवलणे म्हणजे दुसरीकडे कुठेतरी कचरा साठवणे आलेच. मग त्या भागातील लोकांचा विरोध होतो. मेट्रो रिजनमध्ये कचराघरासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचा आराखडा नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे.

कचराघर परिसरातील तीन किमीपर्यंत हवा आणि पाणी प्रदूषित झाले असून आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. भारत सरकारने स्वच्छ भारत मिशन हाती घेतले असले तरी या भागातील प्रदूषण पातळी घटण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. सध्यातरी यावर  ‘डम्पिंग यार्ड’ इतरत्र हलविणे हाच पर्याय असून नवीन ठिकाणी नागरी वस्त्या होऊ नये याची काळजी संबंधित यंत्रणेने आणि लोकांनीही घेणे गरजेचे आहे.

सुमारे ५५ एकरमधील या कचराघरात दररोज संपूर्ण शहरातील ८०० ते १ हजार टन कचरा गोळा केला जातो. नागपूर महापालिकेने जैव-खाणद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु ही पद्धत म्हणजे भांडेवाडी भागात होणाऱ्या प्रदूषणावर अंतिम उपाय नाही.

कचऱ्याचे वर्गीकरण, काही कचऱ्याचा पुनर्वापर तर काही जमिनीत पुरण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून गोळा झालेल्या कचऱ्यावर ही प्रक्रिया करावयाची आहे. सोबत दररोज गोळा होणारा कचरा आहे. ही प्रक्रिया अनेक वर्षे चालणारी आहे. तेव्हा प्रदूषण कमी करणे आणि परिसरातील लोकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करून त्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे.

‘‘भांडेवाडी डम्पिंग यार्ड ७० ते ७५ वर्षांपासून आहे. शहराच्या चारही दिशांना कचरा गोळा करण्याची व्यवस्था असती तर ही समस्या निर्माण झाली नसती. डम्पिंग यार्डची २०१९ पर्यंत मुदत आहे. हा डम्पिंग यार्ड हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगर विकास खात्याने नागपूर सुधार प्रन्यासला मेट्रो रिजनमध्ये डम्पिंग यार्डसाठी तरतूद करण्याचे निर्देश दिले. उमरेड आणि कळमेश्वर भागात त्यासाठी तरतूद झाली आहे.’’

कृष्णा खोपडे, आमदार, पूर्व नागपूर.

‘‘भांडेवाडी येथे जमा झालेल्या कचऱ्याची जैव-खाण द्वारे विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आली आहे. यामुळे लवकरच भांडेवाडी येथील कचऱ्याचे ढिग कमी होतील. भांडेवाडी येथील कचराघर इतरत्र स्थानांतरित होण्यास तीन वर्षे लागतील.’’

श्रावण हर्डीकर, तत्कालीन महापालिका आयुक्त.

‘‘मेट्रो रिजनच्या आराखडय़ात कचराघरासाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती मेट्रो रिजनमध्ये कचराघरासाठी जागा निश्चित करणार आहे.’’

डॉ. दीपक म्हैसेकर, नागपूर सुधार प्रन्यास सभापती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:36 am

Web Title: garbage issue in bhandewadi nagpur
Next Stories
1 रात्री आईसक्रीम, दही खाणार, त्याला दमा होणार!
2 सीबीएसई शाळांकडून पुस्तकांच्या नावाखाली लूट
3 नगरसेवक हरीश ग्वालवंशीसह तिघांवर खंडणीचे गुन्हे
Just Now!
X